

पुढारी ऑनलाईन डेस्क - अनेक चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते मुश्ताक खान यांचे मेरठ-दिल्ली हायवेवरून अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले. पण, संधीचा फायदा घेत त्यांनी आपला जीव वाचवला. २० नोव्हेंबर रोजी मुश्ताक खान एका ॲवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये गेले होते. पण, अशी एक दुर्घटना घडली की, सर्वांनाच धक्का बसला. त्यांचे बिझनेस पार्टनर शिवम यादव यांनी एका इंग्लिश वेबसाईटला सांगितले की, खान यांना धोक्याने चुकीच्या गाडीत बसवण्यात आले होते, त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले होते. (Mushtaq Khan Kidnapped)
मुश्ताक खान यांना दिल्लीमध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फ्लाईट तिकीट आणि ॲडव्हान्स पेमेंट देण्यात आले होते. दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना एका गाडीमध्ये बसवून निर्जन ठिकाणी बिजनोर जवळ नेण्यात आलं. किडनॅपर्सनी त्यांना जवळपास १२ तास बंधक बनवून ठेवलं. खान यांचे बिझनेस पार्टनर शिवम यादव यांच्या माहितीनुसार, किडनॅपर्सनी त्यांना १२ तासापर्यंत खूप टॉर्चर केलं आणि १ कोटींची मागणी केली होती. शिवाय त्यांनी अभिनेता खान आणि त्यांच्या मुलाच्या अकाऊंटमधून २ लाख रुपये वसूल केले होते. (Mushtaq Khan Kidnapped)
शिवम यादव यांच्या माहितीनुसार, ‘पहाटेच्या अजानच्या आवाजाने मुश्ताक खान यांनी जाणलं की, जवळपास कुठेतरी मस्जिद आहे. संधीचा फायदा घेत तिथून त्यांनी पलायन केले आणि लोकांच्या मदतीने किडनॅपर्सच्या तावडीतून सुटले. पोलिसांच्या मदतीने ते आपल्या घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी यशस्वी ठरले’.
शिवम यादव यांनी पुढे सांगितलं की, ‘मुश्ताक सर आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे खूप चिंतेत होते. शिवम म्हणाले की, मी काल बिजनोर जाऊन एफआयआर नोंद केली. आमच्याकडे फ्लाईट तिकीट, बँक अकाऊंट आणि एअरपोर्टचे सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत. ते त्या घराची ओळखदेखील करू शकतात, जिथे त्यांना ठेवण्यात आलं होतं.’