पुढारी ऑनलाईन डेस्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०४ टक्के अतिरिक्त शुल्क लागू केले आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून चीनने हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याची योजना आखल्याची माहिती समोर आलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला प्रत्युतर म्हणून चीन हॉलिवूडपटांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, 'जर चीननं ३४ टक्क्यांचे परस्पर शुल्क मागे घेतला नाही, तर ते चीनी आयातीवर अतिरिक्त ५० टक्क्यांचे शुल्क लादतील.' अशा परिस्थितीत चीन आता चिनी बाजारात हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. २ एप्रिल रोजी अमेरिकेच्या टॅरिफ घोषणेनंतर चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून ३४ टक्के शुल्क लागू केले. पण, यामुळे व्यापार युद्ध भडकले आहे. याचा फटका आता मनोरंजन क्षेत्राला बसणार आहे.
सूत्रांनुसार, एका चिनी पत्रकाराने एका कार्यक्रमात सांगितले की, 'देश अमेरिकेच्या सोयाबीनसारख्या कृषी निर्यातीवर उच्च शुल्क लावेल, सर्व यूएस पोल्ट्री चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालेल आणि अमेरिकन चित्रपटांना देशात प्रवेश करण्यास बंदी घालेल.'
चीनच्या या धोरणामुळे हॉलिवूडला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कारण चीनमध्ये मोठ्या पडद्यावर अनेक हॉलिवूड सिनेमे ब्लॉकबस्टर हिट्स ठरले आहेत. अमेरिकन चित्रपटांचा एक वेगळा चाहता वर्गदेखील तिथे पाहायला मिळतो. सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक चीन असून हॉलिवूडसाठी नुकसान ठरू शकते. चीनी बाजारपेठेत हॉलिवूडपटांना बंदी घातल्यास अमेरिकन बॉक्स ऑफिसच्या उत्पन्नात घट होईल. हा तोटा अमेरिकन चित्रपट उद्योगाला सहन करावा लागू शकतो.
२०२४ मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये मोठी कमाई केली होती. एका रिपोर्ट्सनुसार, अमेरिकी चित्रपटांनी २०२४ मध्ये चीनमध्ये ५८५ डॉलर्स दशलक्ष कमावले, जे चीनच्या १७.७१ डॉलर्स अब्ज बॉक्स ऑफिसच्या अंदाजे ३.५ टक्के होते. आता 'ज्युरासिक वर्ल्ड: रिबर्थ', 'द अकाऊंटंट २' आणि 'मिशन इम्पॉसिबल' या सीक्वल सारखे आगामी चित्रपट चीनमध्ये रिलीज झाले नाही तर हॉलिवूड चित्रपटांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होईल.