पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमेश रेशमिया याने चित्रपटसृष्टीत एक पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून पाऊल ठेवले. आपल्या अनेक लोकप्रिय गाण्यांनी त्याने चाहत्यांचे मनोरंजन केले. हिमेशने आजवर अनेक गायकांना संधी देऊन मोठेही केले.
आता चर्चा सुरु आहे ती हिमेशच्या आगामी चित्रपटाची. हिमेशचा 'BadAss रवी कुमार' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. काही तासातच चित्रपटाच्या ट्रेलरला 13 मिलियनहून अधिक व्हूज मिळाले आहेत. त्याचा आगामी चित्रपट "BadAss रवी कुमार" 7 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या "द एक्सपोज" चित्रपटात हिमेशने साकारलेल्या पात्रावर आधारित आहे.
"BadAss रवी कुमार" हा चित्रपट एक ॲक्शन म्युझिकल एंटरटेनर चित्रपट आहे, ज्यामध्ये रेशमिया पुन्हा एकदा रवी कुमारची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती हिमेश रेशमिया मेलोडीजने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन कीथ गोम्स यांनी केले आहे. चित्रपटाची कथा स्वतः हिमेश रेशमियाने लिहिली असून श्रेया रेशमिया आणि कुशल बक्षी यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
हिमेश रेशमियाच्या या चित्रपटात खतरनाक मारझोडीचे चित्रण अत्यंत रोचक करण्यात आले आहे. चित्रपटातील संवादही दमदार आहेत. अनेकांनी ट्रेलर पाहून हिमेश रेशमियाच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याचे चाहते तर म्हणत आहेत की त्याचा हा चित्रपट केजीएफ आणि अॅनिमल या चित्रपटांनाही मागे टाकेल.सनी लियोनीसारखी प्रसिद्ध अभिनेत्रीदेखील या चित्रपटात आहे.
हिमेशने आजवर अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी त्याच्या कर्ज ,द एक्स्पोस या चित्रपटांची ब-यापैकी चर्चा झाली. आता त्याचा हा आगामी 'BadAss रवी कुमार' चित्रपट चित्रपटगृहात कमाल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.