

पुढारी ऑनलाईन डेस्क: तब्बल ५ वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा होत आहे. दिशा सालियन हिच्या वडीलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांनी उबाठा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात बुधवार २ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार असल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. दिवंगत दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. सतीश सालियन यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने रिट याचिकेची प्रत समीर वानखेडे यांना दिली आहे.
समीर वानखेडे यांचे वकील फैजान मर्चंट यांनी सांगितले आहे की, त्यांचे अशिला उच्च न्यायालयात एक सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहेत, ज्यामध्ये त्यांच्या अशिलांसंबंधीच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे दिली जातील, असे देखील 'ANI'ने वृत्तात म्हटले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या अंत्यविधीचे पाच वर्षांनंतर फोटो समोर आले आहेत. विशेष म्हणजे, चेहऱ्यावर एकही जखम दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिशाने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले होते. मालाड येथील राहत्या घरातून तिने उडी मारून आयुष्य संपवले होते. पण, दिशाचा मृत्यू उडी मारून नव्हे तर तिची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी आता केला आहे. दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही रिट याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाच वर्षांनंतर दिशाच्या वडिलांनी बॉम्बे हाईकोर्टात याचिका दाखल केलीय. सीबीआय तपासाची मागणी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचे दिशाच्या वडिलांचे म्हणणे आहे.