

पुढारी ऑनलाईन डेस्क - गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.
चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट लग्नसंस्था आणि त्यानंतरच्या प्रवासावर आधारित असल्याचे दिसतेय. ट्रेलरमध्ये पुष्कर लग्नासाठी मुली बघत असून त्याच्या आयुष्यात हेमल इंगळे आणि पूर्वी मुंदडा आल्याचे दिसत आहेत. सोबतच त्यांच्या नात्यात काही गुंतागुंतीचे प्रसंगही दिसत आहेत. त्यामुळे पुष्करच्या आयुष्यात नेमकं कोण येणार? त्यांचे वैवाहिक जीवन कसे असणार? ‘पण त्याचं काय’ हा नेमका काय प्रश्न? तो सुटणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या २१ मार्चला मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये पुष्कर नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तर हेमल आणि पूर्वीही जबरदस्त दिसत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना ॲमस्टरडॅम, पॅरिस आणि दुबईची सैरही घडणार आहे.
पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा यांच्यासह या चित्रपटात विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे आणि किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला," ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ हा चित्रपट फक्त लग्नानंतरच्या लैंगिक सुसंगतेबद्दल बोलत नाही, तर तो दोन व्यक्तींमधील भावनिक संवाद किती महत्त्वाचा असतो, हेही अधोरेखित करतो. लग्नानंतरचे जीवन ही नवी परीक्षा असते. या परीक्षेत प्रेम, समंजसपणा, आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. आजच्या धकाधकीच्या जगात दाम्पत्यांनी सुसंवाद साधणे किती महत्त्वाचे असते, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला असून आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच खास स्थान निर्माण करेल."
आनंद पंडित मोशन पिक्चर्स प्रस्तुत, गुझबम्प्स एंटरटेनमेंट यांच्या ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोग यांनी केले आहे. आनंद पंडित, रुपा पंडित आणि पुष्कर जोग निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे सहलेखन नमिष चापेकर यांनी केले आहे.