

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय आणि सैफ अली खान यांच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘हैवान’चा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. बुधवारी वेंकट नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्सने प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाची सुमारे 45 सेकंदांची झलक प्रेक्षकांसमोर आणली. विशेष म्हणजे या टीझरमध्ये अक्षय किंवा सैफ यांचा चेहरा कुठेही दाखवण्यात आलेला नाही.
टीझर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ‘हैवान’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांनी या चित्रपटाला आतापासूनच ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. अक्षय आणि सैफ यांची जोडी यापूर्वी ‘ये दिल्लगी’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘टशन’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसली आहे.
टीझरची सुरुवात रहस्यमय आवाजाने
‘हैवान’च्या टीझरची सुरुवात एका महिलेच्या आवाजाने होते. ती एका उदास धूनवर गाताना ऐकू येते. त्यानंतर फोनवर बोलणाऱ्या एका व्यक्तीची सावली दिसते. पुढील दृश्यातून हा सैफ अली खानचा पात्र असून तो दृष्टीहीन असल्याचे स्पष्ट होते. काही क्षणांनी आणखी एका व्यक्तीची सावली दिसते. काचेच्या भिंतीजवळ उभा असलेला हा रहस्यमय व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार असल्याचे संकेत मिळतात.
दृष्टीहीन सैफ, हत्या आणि हवेतून खाली येणाऱ्या नोटा
टीझरमधील पुढील दृश्यांमध्ये सैफचे पात्र काठीच्या आधाराने चालताना आणि पायऱ्या उतरताना दिसते. तो स्पर्शाच्या माध्यमातून वेळ समजणाऱ्या घड्याळातून वेळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एका व्यक्तीच्या हत्येचे दृश्य दाखवण्यात येते. जमिनीवर पडलेला जखमी व्यक्ती मदतीसाठी हात पुढे करताना दिसतो. यानंतर एका उंच इमारतीवरून नोटा खाली पडताना दिसतात. या दृश्यामुळे हत्येमागे नेमके कारण काय आहे? हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजणार आहे.
अक्षयच्या विक्षिप्त हास्याने टीझरचा शेवट
टीझरच्या अखेरीस अक्षय एका काचेच्या भिंतीवर हात ठेवून आत डोकावताना दिसतो. त्यानंतर रक्तासारख्या लाल रंगात ‘हैवान’ हे चित्रपटाचे नाव स्क्रीनवर उमटते. शेवटी अक्षयच्या पात्राचे वेडेपणाची झलक देणारे भयावह हास्य ऐकू येते.
‘हैवान’ हा ‘ओप्पम’चा हिंदी रिमेक
प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘हैवान’मध्ये अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत सैयामी खेर, श्रिया पिळगावकर आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम निओ-नॉयर क्राईम थ्रिलर ‘ओप्पम’चा हिंदी रिमेक आहे.
मूळ चित्रपटात साऊथ स्टार मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदी आवृत्तीत सैफ अली खान त्याच व्यक्तिरेखेची भूमिका करत असून, तो दृष्टीहीन मार्शल आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लहान मुलीला धोकादायक सायकोपॅथपासून वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. विशेष म्हणजे मोहनलाल यांचीही या हिंदी चित्रपटात कॅमिओ भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपट कधी रिलीज होणार
‘हैवान’ हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.