

मराठी साहित्यातील गाजलेली कलाकृती 'गारंबीचा बापू' आता चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. साहित्यिक वारसा आणि आधुनिक सिनेमाचा संगम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठी साहित्य आणि रंगभूमीवर अमिट छाप सोडणारी ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांची गाजलेली कलाकृती 'गारंबीचा बापू' आता चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दशकांपासून रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी ही कथा आधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य सिनेमॅटिक सादरीकरणासह नव्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे.
'निर्णय', 'हिरकणी' आणि 'योद्धा' (बाबासाहेब पुरंदरे लिखित) यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे तसेच वेबविश्वातही आपला ठसा उमटवणारे दिग्दर्शक गुरुप्रसाद इनामदार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. 'गुरुप्रसाद फिल्म्स'च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे नाव 'गारंबीचा बापू – गोष्ट एका वाघाची' असे आहे.
साहित्यकर्मी, कादंबरीकार श्री. ना. पेंडसे लिखित मराठी रंगभूमी आणि साहित्यविश्वात रसिकांच्या मनावर गारंबीचा बापूने अधिराज्य गाजवले. ही कलाकृती इतकी लोकप्रिय ठरली की, ती आता मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. गुरूप्रसाद फिल्म्स प्रस्तुत 'गारंबीचा बापू - गोष्ट एका वाघाची' या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या लेखणीतून उतरलेला 'बापू' नव्या रूपात कसा असेल, याबद्दल सिनेवर्तुळात आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये धगधगती आग आणि त्या आगीच्या ज्वाळांसमोर दोन हातांनी दरवाजाचे खांब घट्ट पकडून उभा असलेला एक बलदंड व्यक्ती पाठमोरी दिसत आहे. त्याची ही भेदक पाठमोरी आकृती आणि आग चित्रपटातील संघर्ष दाखवते.
'गुरूप्रसाद फिल्म्स' प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरूप्रसाद इनामदार यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद शशी पेंडसे यांनी लिहिले आहेत.
काय 'गारंबीचा बापू'ची कथा?
'गारंबीचा बापू' ही प्रसिद्ध साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांनी लिहिलेली एक अत्यंत लोकप्रिय आणि मैलाचा दगड ठरलेली मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी १९५२ मध्ये प्रकाशित झाली , कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात घडणारी ही एक जगावेगळी प्रेमकथा आणि एका स्वाभिमानी माणसाच्या संघर्षाची कथा आहे. या कादंबरीचे कथानक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे बंदर परिसरातील गावांमध्ये (मुरुड, आंजर्ले, गारंबी) घडते.
बापू हा एक स्वाभिमानी, जिद्दी, स्वावलंबी आणि कर्तव्यकठोर तरुण आहे. बापूची आई आणि इतर समाजाला गावातील कर्मठ गावकरी आणि खोत त्रास देतात. हा बापू मुंबईला जाऊन पैसा कमावतो आणि गारंबी येथे स्वतःचे घर बांधतो. तो गावचे सरपंच आणि अण्णा खोत यांच्याविरुद्ध बंड पुकारतो.