

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी गायक एपी धिल्लनला बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी असलेली मैत्री महागात पडली आहे. याच कारणामुळे त्याच्या कॅनाडातील दोन घरांवर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून सलमान खानशी असलेल्या मैत्रीमुळे हा हल्ला केल्याचा त्यांनी खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की 1 सप्टेंबरच्या रात्री एपी धिल्लनच्या दोन ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. व्हिक्टोरिया बेटावरील आणि टोरंटोमधील वुडब्रिज येथील त्याच्या घरावर गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी गायक धिल्लनकडून अद्याप कोणताची खुलासा करण्यात आलेले नाही. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी रोहित गोदाराच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
अमृतपाल सिंग धिल्लन, ज्याला एपी धिल्लन म्हणून ओळखले जाते. तो एक लोकप्रिय इंडो-कॅनेडियन रॅपर आहे. त्याने सलमान खानसोबतचा ‘ओल्ड मनी’ हा म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे. पण त्याच्या काही आठवड्यांनंतर हा हल्ला झाला आहे. धमकी देताना लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानशी मैत्रीमुळे हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर सलमान खानपासून दूर राहा आणि मर्यादा ओलांडू नका. तसे न केल्यास तूला ठार मारू, असा इशारा दिला आहे.
सध्या कॅनेडियन एजन्सी या व्हायरल पोस्टची चौकशी करत आहेत, ज्यामध्ये हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. सध्या कॅनडाच्या एजन्सींनीही या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही.
गेल्या महिन्यातच एपी धिल्लनचे नवीन गाणे 'ओल्ड मनी' रिलीज झाले होते, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त दिसले होते. सलमान खानने या गाण्याची एक छोटी क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली होती, ज्यात सलमान खान आणि एपी धिल्लन जबरदस्त ॲक्शन स्टाइलमध्ये दिसत आहेत.
गेल्या वर्षीही असेच एक प्रकरण समोर आले होते जेव्हा पंजाबी गायक करण औजला याच्याही घरावर गोळीबार झाला होता. त्या मागेही सलमान खानशी मैत्री हेच कारण होते. औजलाच्या कॅनडातील व्हँकुव्हर येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती आणि सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात म्हटले होते की, औजलाची सलमान खानशी मैत्री आहे, त्यामुळेच आम्ही त्याच्या घरावर गोळीबार केला.
मुंबईत सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाला होता. त्याची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. एवढेच नाही तर बिश्नोई गँगने सांगितले की, हरणाची शिकार केल्याप्रकरणी आम्ही सलमान खानला माफ करणार नाही.’