Sanjay Leela Bhansali Love and War Movie
नवी दिल्ली: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. सध्या त्यांच्या आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर' मुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जोधपूरमधील एका व्यक्तीने संजय भन्साळी यांच्यावर फसवणूक आणि गैरवर्तनाचा गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा बहुप्रतिक्षित चित्रपट चर्चेत आला आहे.
बिचवाल पोलिस ठाण्यात दाखल झालेला हा गुन्हा भन्साळी यांच्या बहुचर्चित "लव्ह अँड वॉर" चित्रपटाच्या चित्रीकरणाशी संबंधित आहे. एफआयआरमध्ये फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात, धमकी आणि संघटित कट रचणे असे गंभीर आरोप समाविष्ट करण्यात आले आहेत. राधा फिल्म्स अँड हॉस्पिटॅलिटीचे सीईओ आणि लाइन प्रोड्यूसर प्रतीक राज माथूर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये भरती प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेत फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. माथूर यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, त्यांना 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचा निर्माता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था केली आणि त्यासाठी त्यांचा मोठा पैसा खर्च झाला. त्यानंतर अचानक कोणतीही रक्कम न देता त्यांना चित्रपटातून बाहेर काढण्यात आले.
इतकंच नाही, तर बीकानेरच्या हॉटेल नरेंद्र भवनमध्ये संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीममधील सदस्यांनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि त्यांचा अपमान केला. तसेच, त्यांना धमक्याही देण्यात आल्या. ही घटना गेल्या १७ ऑगस्ट रोजी घडली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. माथूर यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
'लव्ह अँड वॉर' पूर्वी संजय लीला भन्साळी त्यांच्या 'पद्मावत' चित्रपटावरूनही वादात सापडले होते. करणी सेनेने या चित्रपटाचा जोरदार विरोध केला होता आणि त्यावेळी संजय भन्साळी यांना मारहाणही झाली होती. 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विक्की कौशल हे कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत.