मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव स्टारर ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित

 नम्रता - मुक्ता
नम्रता - मुक्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हिरण्यगर्भ मनोरंजन'निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट 'नाच गं घुमा'चा टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. महिलाप्रधान चित्रपट म्हणून आणि त्याच्या वेगळ्या विषयामुळे 'नाच गं घुमा' चर्चेत असताना या आकर्षक अशा टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी 'नाच गं घुमा'मध्ये अभिनयाची जबाबदारी यशस्वीपणे आपल्या खांद्यावर पेलली आहे. स्त्रीत्त्वाला वाहिलेला हा चित्रपट कामगार दिनी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे.

मुक्ता आणि नम्रता यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कमावली बाई असते…' अशा आशयाच्या वाक्यांनी सुरु होणाऱ्या या टीझरमध्ये मग घरची मालकीण आणि घरातील मोलकरीण यांच्यात नेहमीचेच, घराघरात अनुभवाला येणारे, खुमासदार, रंजक संवाद झडतात. ते एवढे खिळवून ठेवतात की, 'हे काहीतरी वेगळे आहे,' याची प्रचीती प्रेक्षकाला येवून जाते. फोनवर बोलणाऱ्या मोलकरणीवर म्हणजे आशाताईवर घरातील गृहिणी रागावते, पुढे उशिरा कामावर येण्यावरून या दोघींमध्ये वाद होतो. त्याला प्रत्युत्तर देतना आशाताई 'बस नाही भेटली…रस्त्यात अॅक्शीटंट झाला होता ..' अशी कारणे सांगतात. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या दमदार अभिनयाची चुणूक या टीझरमध्ये दिसून येते.

तुमच्यामुळे भोपळा गेला कचऱ्यात..' म्हणून आशाताईना मालकीण झापते तेव्हा ती त्यांना 'माणूसच आहे मीपण, विसरणार ना," असे उत्तर देते. पुन्हा 'तुम्ही नाही का पाकीट विसरला होतात,' अस युक्तिवाद करते. त्यावर मालकीण बाई रागावतात आणि 'माझी बरोबरी करता तुम्ही," म्हणून रागावतात… अशा छोट्या छोट्या खुमासदार आणि रंजक प्रसंगांनी हा टीझर नटलेला आहे. एका प्रसंगात या आशाताई मालकिणीच्या नवऱ्याने 'थँक यू आशाताई' म्हटल्यावर 'गो तू हेल' म्हणतात. असा हा टीझर पाहिल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढते. टीझरमध्ये शेवटी एक वाक्य येते, "तिसरे महायुद्ध झाले ना, तर ते कामवाल्या बाईंमुळे होईल, हे लिहून ठेवा."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news