

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने त्यांच्या सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर पोस्टमध्ये ही माहिती दिली. आशा शर्मा यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष चित्रपटात त्यांनी शबरीच्या भूमिका साकारली होती. (Asha Sharma)
आशा शर्मा यांच्या निधनावर मीडियाशी बोलताना अभिनेत्री टीना घई म्हणाल्या, गतवर्षी त्यांचा आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या घसरुन पडल्या होत्या. तेव्हापासून त्या अंथरुणाला खिळून होत्या; पण अशा अवस्थेत सुद्धा त्यांना काम करायची इच्छा होती. त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे होते.
आशा शर्मा यांनी वयाच्या तेराव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये आई आणि आजीची भूमिका साकारण्यासाठी त्या ओळखल्या जात. त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 'दो दिशायन' या चित्रपटात काम केले होते. अशा शर्मा 'मुझे कुछ कहना है', 'प्यार तो होना ही था' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' या चित्रपटांमध्येही दिसल्या होत्या. गतवर्षी आशा शर्मा यांनी प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' मध्ये काम केले होते.
आशा शर्मा हे टीव्ही जगतातील सर्वात मोठे नाव हाेतं. त्यांनी साकारलेल्या पात्रांमुळे त्यांची रसिकांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. आशा शर्मा यांना 1986 च्या 'नुक्कड' आणि 'बुनियाद' (1987) मधून ओळख मिळाली. स्टार परिवार अवॉर्ड शोमध्ये फेव्हरेट एल्डरली अवॉर्ड श्रेणीसाठी त्यांना नामांकनही मिळाले आहे. याबरोबरच आशा यांनी 'मुझे कुछ कहना है' (2001), 'हम तुम्हारे हैं सनम' (2002), 'हमको तुमसे प्यार है' (2006) आणि '1920' (2008) यासह सुमारे 40 चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'महाभारत' (1997) आणि 'कुमकुम भाग्य' (2019) सारख्या मालिकांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त, तिने 'टॉफी' (2017) आणि 'द लास्ट जॅम जार' (2021) सारख्या लघुपटांमध्येही काम केले आहे.