डिजिटल माध्यमाने फार मोठं आव्हान सिनेमासृष्टीसमोर उभं केलं आहे. मुद्दा केवळ व्यवसायाचा नाहीय; तर डिजिटल माध्यमांनी लोकांचा पेशन्स कमी केला आहे. लोकांना सिनेमा हवा तेव्हा थांबवण्याचं… पुढं नेण्याचं… मागं नेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जे स्वातंत्र्य सिनेमागृहं देत नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून एकूण सिनेमासृष्टीचं गणित पुरतं बदलून गेलं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की, अलीकडे आपल्यापैकी अनेक लोक सिनेमा बघायला सिनेमाघरांमध्ये जात नाहीत. पूर्वी आपण मंडळी सिनेमा टी.व्ही.वर यायची वाट बघत असो; पण आता त्यात भरच पडली आहे. अलीकडचे सिनेमे 'ओटीटी' म्हणजे 'ओव्हर द टॉप'च्या माध्यमातून आपल्या टी.व्ही.च नव्हे, तर अगदी मोबाईलपर्यंत आले आहेत. म्हणूनच मोठ्या पडद्याला आता 'ओटीटी'ची स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकतंय कोण? हे काळच ठरवेल; पण ही स्पर्धा होतेय, हे खरंच आहे. अर्थात, या विषयाच्या खोलात घुसायचं असेल, तर आपल्याला साधारणत: चार वर्षे मागे जायला हवं.
कोरोना काळात काय झालं होतं? आपण सगळे घरी होतो. नाट्यगृहं… सिनेमाघरं बंद होती. नाही म्हणायला, छोटा पडदा सुरू होता. बबल तयार करून त्यांची कामं सुरू होती आणि याच काळात 'ओटीटी'चा वापर वाढला. 'ओटीटी'च नव्हे, तर यूट्यूबचा वापर जवळपास हजार पटींनी वाढला. कारण, सगळी मंडळी घरात होती. प्रत्येकाच्या हातात फोन होता आणि मनोरंजन उपलब्ध झालं होतं. यूट्यूब तर प्रत्येकाची भूक फुकट भागवत होतं आणि त्यातून ज्यांना काही पैसे भरणं शक्य होतं त्या लोकांनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, झी 5, जीओ यासारखे 'ओटीटी' आत्मसात करून आपली हौस भागवली. बरं, हा कोरोनाचा काळ थोडा थोडका नव्हता. तो जवळपास दीड वर्ष होता. कुठल्याही गोष्टीची सवय व्हायला दोन महिने हा अवधी पुरतो. इथे तर जवळपास सोळा महिने मिळाले होते. त्यामुळे या सवयीचं रूपांतर व्यसनात झालं.
या 'ओटीटी'ने लोकांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळा बदलल्या. रात्र रात्र एपिसोड पाहून लोकांचे डोळे सुजू लागले… दिवसा झोपा होऊ लागल्या. हा एक भाग. पण, सवय जडल्याने आणि दुसरी गोष्ट मनोरंजनाची भूक भागू लागल्याने लोकांना सिनेमाचा नाही; पण सिनेमाघरांचा विसर पडला. इथेच सुरू झाली स्पर्धा. सुरुवातीला थिएटर मालकांना… एग्झिबिटर्सना… डिस्ट्रिब्युटर्सना याची भीतीही वाटली. लोकांना बाहेर काढायचं कसं? हा प्रश्न होता… तुम्हाला आठवत असेल, तर त्यावेळी रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या सिनेमाची चर्चा होती. इतरही अनेक सिनेमे रांगेत आणि चिंतेत होते; पण रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'कडे आस लागली होती. अशात त्याचा 'सर्कस' हा सिनेमा पडला होता. सलमानच्या सिनेमाकडे लोकांनी पाठ फिरवली होती; पण 'सूर्यवंशी' आला आणि लोक पुन्हा थिएटरकडे वळले. त्याचवेळी 'कांतारा', 'पुष्पा' असे दक्षिणी सिनेमेही आले. मराठीही मागे नव्हता. मराठीत 'झिम्मा', 'पांडू' अशा सिनेमांनीही कमाल केली. हे सिनेमे पाहायलाही मराठीजन थिएटरमध्ये आले… इथून पुढं काय झालं ते आपण सगळे जाणतो.
पण, इथे खूप मोठा बदल घडला. तो लक्षात घेणं गरजेचं आहे.
पूर्वी आपण आपल्याला सिनेमा पाहावा वाटला की, तो थिएटरमध्ये जाऊन पाहायचो; पण आता प्रेक्षकांच्या मानसिकतेत महत्त्वाचे बदल झाले. त्यापैकी एक असा की, लोकांना सिनेमॅटिक एक्स्पिरिअन्स देऊ शकणार्या सिनेमांना थिएटरमध्ये गर्दी होऊ लागली. त्या पद्धतीचे सिनेमे देणारी मंडळी पुढे आली. अगदी रोहित शेट्टीपासून एस. एस. राजामौली अशा मंडळींसाठी संधी आली. कारण, डिजिटल मीडियाच्या झालेल्या अभ्यासानुसार, बहुतांश तरुणवर्ग आता डिजिटलीच मनोरंजन पाहतो आणि त्यांचा दिवसातला वेळ आहे दोन तास. त्यातही ही सगळी मंडळी रात्री हा डेटा कन्झ्युम करत असतात. ही सगळी सवय लॉकडाऊनने लावली. त्यामुळे बहुतांश वर्ग घरात घडणारी कथानकं मोबाईलवर पर्यायाने 'ओटीटी'वर पाहू लागला. इथे सिनेमांचे धाबे दणाणले आहे.
अगदी अलीकडचा विचार करायचा, तर हिंदीत आलेले 'जवान', 'पठाण', 'अॅनिमल' हे सगळे सिनेमे काय सांगताहेत… यात भव्यता दिसते. शिवाय गोष्ट. अर्थात, नुसती गोष्ट असून चालत नाही. कारण, भव्यता असूनही ज्या सिनेमांना गोष्ट किंवा किमान लॉजिक नव्हतं, असे सिनेमे पडले. यातलं उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडे आलेला 'टायगर.' सिनेमा चालल्याचं सांगणारी आकडेवारी याबद्दल सध्या आपण नको बोलायला; पण जरा डोळसपणे पाहिलं तर सगळं चित्र स्पष्ट होतं. हे सगळं झालं; कारण डिजिटल माध्यमाने फार मोठं आव्हान सिनेमासृष्टीसमोर उभं केलं आहे. मुद्दा केवळ व्यवसायाचा नाहीय; तर डिजिटल माध्यमांनी लोकांचा पेशन्स कमी केला आहे. लोकांना सिनेमा हवा तेव्हा थांबवण्याचं… पुढं नेण्याचं… मागं नेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. जे स्वातंत्र्य सिनेमागृहं देत नाहीत.
लॉकडाऊनमध्ये लोकांचा कल घरबसल्या मनोरंजनाकडे वळल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक घटक त्यांच्यासाठी पुढे आले. म्हणजे नेटवर्क कंपन्यांनी 'ओटीटी'सोबत टायप केले. 5-जी सुविधा आणली गेली. इंटरनेट आणखी जलद झालं. टी.व्ही. कंपन्यांनी मोठे टी.व्ही. अनेक सोयी-सवलतींसह बाजारात दाखल केले. त्यामुळे सिनेमाघरात मिळणारा अनुभव थोड्याफार फरकाने लोकांना मिळू लागला. त्यामुळे अगदीच सिनेमा आणखी सोपा झाला. त्यात भर म्हणून की काय, लॉकडाऊननंतरही लोकांनी 'ओटीटी'ला चिकटून राहावं म्हणून 'ओटीटी' कंपन्यांनी आपलं सबस्क्रिप्शन कमी केलं. याचा परिणाम असा झाला की, सिनेमाचं आव्हान आणखी वाढलं.
यातून एक गोष्ट उत्तम झाली, ती सिनेमाचं व्याकरण बदललं. सिनेमाने वेबसीरिजच्या व्याकरणाशी बरोबरी सुरू केली. आता हे सिनेमेही अधिक वेगवान झालेले दिसताहेत. तसं असलं तरी 'ओटीटी' आणि सिनेमा यांच्यातली स्पर्धा संपलेली नाही. अगदी सिनेमा थिएटरवर असतानाच 'ओटीटी'वरही हे सिनेमे येऊ लागले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे '12 वी फेल' हे आहे. हा सिनेमा आता 'ओटीटी'वर येतोय. यापूर्वी मराठीत बोलायचं, तर 'सुभेदार' हा गाजलेला दिग्पाल लांजेकर यांचा सिनेमा थिएटरवर असतानाच 'ओटीटी'वर आला. सिनेमा चलो वा न चलो. ठराविक दिवसांचं अंतर ठेवून हे सिनेमे रीलिज होऊ लागले आहेत. ही स्पर्धा आता आणखी तीव्र होईल, यात शंका नाही. आपले सिनेमे जास्तीत जास्त सिनेमॅटिक बनवण्याशिवाय पर्याय नसेल. शिवाय, तो सिनेमा एक अनुभवही वाटला पाहिजे. जे जे सिनेमे अनुभव देतील ते सिनेमे थिएटरवर चालतील; अन्यथा त्या सगळ्यांना 'ओटीटी'च्या रांगेत उभं राहण्याशिवाय पर्याय नसेल.दुसरीकडे, 'ओटीटी'लाही मर्यादा आहेत. एकावेळी कोणतंही 'ओटीटी' मर्यादित चित्रपट घेऊ शकतं. इकडे मागणीपेक्षा पुरवठा वाढला, तर किमतीवर त्याचा परिणाम होणार आहेच. पण, एक नक्की, यात फायदा रसिकराजाचाच होणार आहे, यात शंका नाही.
त्यामुळे आपल्याला याची चिंता नसावी. जे सिनेमे चांगले आहेत ते थिएटरला जाऊन पाहणं… आणि नसेल तर तो 'ओटीटी'वर पाहणं इतकंच आपल्या हाती.