पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याची वेबसेरिज शो टाइमचे प्रमोशन करत आहे, यासाठी इम्रान हाश्मी वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. दरम्यान एका मुलाखतीत इम्रान हाश्मीने ऐश्वर्या रॉय बच्चन हिची जाहीर माफी मागितली आहे.
ऐश्वर्या रॉय प्लास्टिकची आहे आणि फेक आहे, असे वक्तव्य इम्रान हाश्मीने काही वर्षांपूर्वी केले होते. या प्रकरणावर इम्रान हाश्मीने खुलेपणाने सविस्तर माहिती देत ऐश्वर्याची माफी मागितली आहे.
'द लल्लन टॉप' या वेबसाईटला इम्रान हाश्मीने मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान इम्रानला या वक्तव्याचा पश्चाताप होतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर इम्रान म्हणाला, "मला या गोष्टीचा पश्चाताप होतो. मी ज्या व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केले होते, तिच्याबद्दल माझ्या मनात फार आदर आहे. पण मी जे वक्तव्य केले ते चुकीचे आणि अप्रिय होते. ऐश्वर्याला माझ्या या वक्तव्याबद्दल वाईट वाटले, असे तर मी तिची माफी मागू इच्छितो."
ज्या शोमध्ये मी हे वक्तव्य केले, त्या वेळी आम्ही एक गेम खेळत होतो, मला या गेममध्ये गिफ्ट जिंकायचे होते, म्हणून मी हे वक्तव्य केले होते. मला ऐश्वर्याचा अपमान करायचा नव्हता, असेही तो म्हणाला.
मी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. याबद्दल ऐश्वर्याला वाईट वाटले असेल, तर मी माफी मागतो
इम्रान हाश्मी
इम्रान खानने कॉफी विथ करणच्या चौथ्या सिझनमध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर इम्रानला सोशल मीडियावर ट्रोलही केले गेले होते. या प्रकरणात ऐश्वर्या रॉयने कधी थेट प्रतिक्रिया दिलेली नव्हती. २०१९ला फिल्मफेअर या नियतकालिकाला ऐश्वर्याने मुलाखत दिली होती, त्या मात्र इम्रानचे नाव न घेता तिने यावर प्रतिक्रिया दिली होती. तुम्हाला जेव्हा फेक आणि प्लास्टिक म्हटले जाते, तेव्हा तुम्हाला फार वाईट वाटते, असे ती म्हणाली होती.