

dhurandhar cast who is sara arjun richest child actress in india is 20 years younger to ranveer singh
पुढारी ऑनलाईन :
रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ सिनेमा बॉक्स आफिसवर तुफान चालत आहे. तसेच यातील कलाकारांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणवीर सिंहसोबत दिसणारी हिरोईन सारा अर्जुनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाने रणवीर सिंहपेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान असलेली सारा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पण सारा अर्जुन नेमकी आहे तरी कोण, ती कोणाची मुलगी आहे आणि कधी काळी ती देशातील सर्वात श्रीमंत चाइल्ड अॅक्टर होती, हे तुम्हाला माहीत आहे का?‘
धुरंधर’ची हिरोईन सारा अर्जुन कोण आहे?
रणवीर सिंहचा मल्टिस्टारर, जबरदस्त अॅक्शनपट ‘धुरंधर’ आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. हा चित्रपट भारत-पाकिस्तान संबंध आणि गुप्तहेर कथानकावर आधारित आहे. चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.
या सगळ्या तगड्या स्टारकास्टमध्ये लक्ष वेधून घेतले, तो चेहरा म्हणजे सारा अर्जुनने अवघ्या 20 वर्षांची सारा याआधी ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटातून चर्चेत आली होती. त्याआधी तिने अनेक हिंदी चित्रपटांत चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. रणवीर सिंहसारख्या वयाने दुप्पट कलाकारासोबत तिची जोडी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सारा अर्जुनचे वडील आहेत साऊथचे सुपरस्टार
18 जून 2005 रोजी मुंबईत जन्मलेल्या सारा अर्जुन या प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता राज अर्जुन यांची मुलगी आहे. ती केवळ एका वर्षाची असताना, पालकांसोबत मॉलमध्ये फिरताना तिला पहिली जाहिरात मिळाली. तेव्हापासून ती लाईट्स–कॅमेरा–अॅक्शनच्या जगात सक्रिय आहे.
रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांच्यातील वयाचा फरक
चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हाच दोघांच्या वयातील फरकावर वाद निर्माण झाला होता. रणवीर सिंह 40 वर्षांचे असून सारा अर्जुन केवळ 20 वर्षांची आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’मधील नंदिनीच्या भूमिकेतून प्रसिद्धी
2022 साली मणिरत्नम यांच्या भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन’ (भाग 1 व 2) मध्ये सारा अर्जुनने नंदिनीच्या तरुण वयातील भूमिकेत काम केले. या चित्रपटात ऐश्वर्या राय यांनी नंदिनीची प्रमुख भूमिका साकारली होती.
सारा अर्जुनचे चित्रपट
सारा अर्जुनने 2011 साली हिंदी चित्रपट ‘404’ आणि तमिळ चित्रपट ‘देइवा थिरुमगल’ मधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘एक थी डायन’ (2013) ‘जय हो’ (2014) ‘जज्बा’ (2015) ‘द साँग ऑफ स्कॉर्पियन्स’ (2017) ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ (2019) ‘अजीब दास्तान्स’ (2021) या चित्रपटांत काम केले आहे.
सारा अर्जुनचे कुटुंब
साराचे वडील राज अर्जुन हे प्रसिद्ध अभिनेता आहेत. तिची आई सान्या अर्जुन या डान्स टीचर आहेत. साराचा लहान भाऊ सुहान अर्जुन यानेही 2016 मध्ये ‘डिनर’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनयात पदार्पण केले आहे.
सारा अर्जुनची नेटवर्थ: सर्वात श्रीमंत चाइल्ड अॅक्टर
‘सियासत’ आणि ‘गुल्टे’ यांच्या 2023 च्या अहवालानुसार, ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटांच्या यशामुळे सारा अर्जुनची एकूण संपत्ती सुमारे ₹10 कोटी इतकी झाली. त्यामुळे ती भारतातील सर्वात श्रीमंत चाइल्ड आर्टिस्ट ठरली.
दोन वर्षांपासून जाहिरातींमध्ये काम
सारा अर्जुन अवघ्या दोन वर्षांची असल्यापासून टीव्ही जाहिराती करत आहे. तिने मॅकडोनाल्ड्स, LIC हाउसिंग फायनान्स, कल्याण ज्वेलर्स, मॅगी हेल्दी सूप यांसारख्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.
कथ्थक, हिप-हॉप आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण
2018 साली साराची हिंदी शॉर्ट फिल्म ‘द परफेक्ट गर्ल’ प्रदर्शित झाली होती. आईकडून मिळालेल्या डान्सच्या वारशामुळे सारा कथ्थक आणि हिप-हॉप या नृत्यप्रकारांचे प्रशिक्षण घेतले आहे.
याशिवाय तिने जिम्नॅस्टिक, कराटे आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्सचेही प्रशिक्षण घेतले आहे. मोकळ्या वेळेत तिला फुटबॉल आणि कबड्डी खेळायला आवडते.