पुढारी ऑनलाईन डेस्क - धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून "धर्मवीर २" या आगामी चित्रपटातील "असा हा धर्मवीर...." हे गाणं सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. बहुप्रतीक्षित "धर्मवीर - २" चित्रपटाच्या ट्रेलरमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
दिघे यांची वेगवेगळी रुपं दाखवणारं, प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारं असे हे गाणं आहे. विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या ह्या गीताला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अविनाश - विश्वजीत या जोडीने संगीत दिले. बॉलिवुड गायक सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आले आहे.
"धर्मवीर -२" या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स यांनी केली आहे. लेखन, दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.