

Dhanashree Kadgaonkar Struggle Story: तुझ्यात जीव रंगला या प्रसिद्ध मालिकेत राणा दाची वहिणी अर्थात वहिणीसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या धनश्री काडगांवकरचा स्वॅग सर्वांना माहिती आहेच. ऑन स्क्रीन एका सुखवस्तू कुटुंबातील थोरल्या सुनेची भूमिका साकरणाऱ्या धनश्रीनं त्या मालिकेतून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आपली ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, धनश्री काडगांवकरनं नुकतेच जयंती वाघधरे यांच्या पॉडकास्टमध्ये आपण मुंबईत घर घेण्याचं स्वप्न कसं पूर्ण केलं हे सांगितलं. धनश्री ही कोल्हापुरातील एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मली होती अन् तिच्या दृष्टीने पैसा अन् पैसा कमवणं किती गरजेचं होतं हे तिनं या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
सध्या 'आम्ही असं ऐकलं' या पॉडकास्टमधील धनश्रीचा एक रील तुफान व्हायरल होत आहे. त्यात धनश्री आपण कसे पैसे वाचवायचो हे सांगितलं. ती म्हणाली, मी सगळीकडे बसने जायचे. मी रिक्षाने जायचे नाही. पैसे सेव्ह करायचे म्हणून पेइंग गेस्ट म्हणून राहायचे.'
जेवणाच्या बाबतीत देखील तिनं एक सूप आठ दिवस पिऊन कसे दिवस काढले हे देखील सांगितलं. धनश्री म्हणते, 'तिथे एक सूप मिळत होतं. ज्याच्यामध्ये मे बी दोन लोकांसाठी दोन बाऊल सूप होत असेल. ते एक सूपचे पाकीट मी आठ दिवस पाणी घालून घालून पुरवायचे. तो माझा डिनर असायचा यार.. म्हणजे मला कोणी असं सांगितलं नव्हतं की तू असं पैसेच वाचव वगैरे आणि हे मी कधीच कोणाला सांगितलेल नाहीये पण मी असंच करायचे कारण मला पैसे सेव करायचे होते.'
धनश्रीनं तिच्यासाठी पैसा कमवणे का महत्वाचं होतं हे सांगितलं. 'पैसा मला कमवायचाच होता मला खूप इम्पॉर्टंट होता पैसा कारण मी काय माझ्या घरी असा खूप पैसा बघितलेला नव्हता. अत्यंत मिडल क्लास फॅमिलीतन आलेली मी मुलगी होते आई आणि पप्पांची मी सगळी धडपड बघायचे की हे पण करायचं. बर ती एवढी शिक्षण देऊन सगळं करून त्यांनी आम्हाला एक एक कलाही शिकवल्या होत्या.
'माझा भाऊ सुद्धा आज गाण्यामध्ये पुढे आहे. तो उत्तम क्लासिकल गातो. मी क्लासिकल डान्स शिकलेली मुलगी आहे. त्यामुळे या सगळ्यासाठी होणारा खर्च त्यांची धडपड धावपळ मी बघितली होती. त्यांचा स्ट्रगल मी बघितला होता सो मला माहिती होतं की पैसा किती महत्त्वाचा आहे सो तेव्हापासून मी ते ठरवलं होतं की आपल्याला सेव्ह करायच आणि आपल्यालाही छान राहायचं. मुंबईत घर घ्यायचंय भाई आपल्याला आणि घेतलेल आहे.'