पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲवॉर्ड विजेता हिंदी चित्रपट 'ढाई आखर'चा ट्रेलर मुंबईमध्ये रिलीज करण्यात आला. यामध्ये संवाद अतिशय हृदयस्पर्शी आहेत. दिग्दर्शक प्रवीण अरोडा यांची मृणाल कुलकर्णी स्टारर हा चित्रपट लेखक अमरीक सिंह दीप यांच्या "तीर्थाटन के बाद" या कादंबरीवर आधारित आहे. (Mrinal Kulkarni)
हा ट्रेलर प्रेमाच्या भावना आणि मानवी नात्यांच्या गुंतागुंतीला खूप सुंदर पद्धतीने मांडतो. 'ढाई आखर' ह्या चित्रपटात घरगुती हिंसा दर्शवण्यात आली आहे, ज्यातून एक महिला तिची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करताना प्रेमाच्या कोमल भावनांचा अनुभव घेते. (Dhai Aakhar Movie )
ट्रेलरमध्ये काही संवाद खूप हृदयाला भिडणारे आहेत. "तुमचं आमचं नातं काय आहे?" यावर उत्तर येतं, "नात्याला नाव असणं गरजेचं आहे का?" तसेच "अनिच्छित पुरुषासोबत लग्न करणे, त्याच्यासोबत शयन करणे आणि त्याच्या अंशाला गर्भात धारण करणे पाप आहे," अशा संवादातून दुःख आणि वेदनाही दिसून येतात.
ट्रेलरच्या शेवटी, "जिथं बंधन असतं, तिथं प्रेम नसतं, आणि जिथं प्रेम असतं, तिथं बंधन नसतं," हा संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. या २ मिनिटे ४० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि मानवी नात्याची कथा प्रभावीपणे सांगितली जाते. या चित्रपटाचे संवाद असगर वसाहत यांनी लिहिले असून, गीतकार इरशाद कामिल यांचे गाणेही चित्रपटात आहेत.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात 'हर्षिता' च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट आणि थिएटरमधील नामांकित अभिनेता हरीश खन्ना आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता रोहित कोकाटे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुप्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांनी लिहिले आहेत. या उत्कृष्ट चित्रपटाच्या टीममध्ये गीतकार इरशाद कामिल, हिंदी आणि बंगाली संगीत दिग्दर्शक अनुपम रॉय आणि गायिका कविता सेठ यांचा समावेश आहे.
या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर मागील वर्षी IFFI गोवामध्ये झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'ढाई आखर' २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.