Comedian Zakir Khan Taking Break :
स्टँड अप कॉमेडियन झाकीर खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याने आपले दौरे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३८ वर्षाच्या झाकीर खाननं याची माहिती इन्स्टाग्राम स्टोरी ठेवून दिली. सध्या त्याची ही इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानं अचानक हा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
गेल्या दशकभरापासून देशातील अन् देशाबाहेरील लोकांना देखील हसवणारा झाकीर खान हा आता ब्रेक घेणार आहे. झाकीर खाननं सांगितलं की त्यांच शेड्युल हे अत्यंत थकवणारं आहे. त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होत आहे. आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये तो म्हणतो. 'मी गेल्या दहा वर्षापासून स्टँड अप शोसाठी सतत दौरे करतोय. मी माझ्या पाठीराख्यांनी आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे. मात्र अशा प्रकारे सतत दौरे करणे हे आरोग्यासाठी चांगलं नाही.'
तो पुढं म्हणाला, 'मी गेल्या वर्षभरापासून आजारी आहे. मात्र तरी देखील मी काम करतोय कारण ते मला त्यावेळी गरजेचं वाटलं. मला स्टेजवर जाणं खूप आवडतं. मात्र मी आता ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला हा ब्रेक घ्यायचा नव्हता मात्र मी माझ्या तब्येतीकडं खूप काळापासून दुर्लक्ष करतोय.'
जरी झाकीर खाननं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी झाकीर खान त्याचे पापा यार... हा शो सुरू ठेवणार आहे. त्यासाठी तो भारतभर दौरे करणार आहे. मात्र या दौऱ्यांची संख्या खूप कमी करण्यात आली आहे. याबाबत झाकीर खान म्हणाला, 'यावेळी मी कमी शहरांमध्ये दौरे करणार आहे. मी अजून शो वाढवणार नाही. एक विशेष विक्रम केल्यानंतर मला एका मोठ्या ब्रेकवर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'
झाकीर खानचे हे दौरे २४ ऑक्टोबर २०२५ पासून ११ जानेवारी २०२६ पर्यंत होणार आहेत. झाकीर यादरम्यान, बडोदा, अहमदाबाद, दिल्ली, बंगुळरू आणि कोलकाता या शहरात शो आयोजित करणार आहे. इंदौरच्या चाहत्यांना उद्देशून झाकीर म्हणाला की इंदौरचा समावेश दौऱ्यामध्ये नसेल. मात्र भोपाळच्या जवळ होणाऱ्या शोमध्ये तुम्ही मला भेटू शकता.