

पुढारी ऑनलाईन डेस्क - कॉमेडियन सुनील पाल, अभिनेता मुश्ताक खान अपहरण केसमधील मुख्य आरोपी लवी पाल उर्फ सुशांत चौधरी जखमी झाला आहे. बिजनौर पोलिसांनी रविवारी रात्री झालेल्या एन्काऊंटरमध्ये लवी पालला अटक करण्यात आली आहे. लवी पालवर २५ हजारांचे बक्षीस होते. त्याच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याच्याकडून छोटी बंदूक, काडतुसे, ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरमातील दोन आरोपी फरार आहेत.
रविवारी रात्री २ वाजता पोलिसांना सूचना मिळाली की, जैन फार्मवर लवी पाल त्याचा एक साथीदार शिवम सोबत पोहोचणार आहे. पोलिस तिथे पोहोचली तेव्हा लवी पालन गोळीबार करणे सुरु केले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्या पायात गोळी मारली. दरम्यान, संधी साधून शिवम तिथून पळून गेला.
मीडिया रिपोर्टनुसार, शहर कोतवाल उदय प्रताप यांनी सांगितलं की, लवी पाल या संपूर्ण अपहरण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. २० नोव्हेंबर रोजी मुश्ताक खान आणि २ डिसेंबर रोजी सुनील पालचे अपहरण करून खंडणी वसूल करण्यात आली होती. मुश्ताक खानची केस बिजनौर तर सुनील पालची केस मेरठच्या ठाण्यात दाखल आहे. १४ डिसेंबर रोजी बिजनौर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत अनेक आरोपींना अटक केली होती.