

पुढारी ऑनलाईन डेस्क - विक्की कौशलच्या छावा चित्रपटातील गाण्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप नोंदवला आहे. दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. चित्रपटात अभिनेता विक्की कौशलला छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत एका गाण्यात डान्स करताना दाखवण्यात आले आहे.
यावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, चित्रपट निर्मात्यांना माझी सहकार्य करण्याची तयारी आहे. इतिहासकार आणि जाणकार मंडळींना त्यांनी बोलवावं. आम्ही त्यात दुरुस्ती सूचवू. हा चित्रपट जगभरात पोहोचावा, असं आम्हाला वाटतं. जाणकारांची सभा घेऊ. संभाजीराजेंना जगभरात पोहोचावे, हा हेतू आमचादेखील आहे. लक्ष्मण उतेकर आणि इतिकासकारांची सभा घेऊन छावा सिनेमात काही दुरुस्ती कराव्यात.
दरम्यान, मराठी क्रांती मोर्चाने या गाण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले, छावा चित्रपटात संभाजी महाराज हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणे चुकीचे नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा आहे. संभाजी राजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही आनंदाची बाब आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी विनंती केली होती. आता देखील त्यांना विनंती आहे, त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा.
छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उतेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत, अशीच आमची ही इच्छा आहे.