

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॅडॉक फिल्म्ससाठी या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असणा-या 'स्काय फोर्स' या चित्रपटाने १०० कोटी रुपये कमावले आणि आता त्यांचीच निर्मिती असणाऱ्या विकी कौशल अभिनित 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. विकी कौशल अभिनीत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत २१५.३६ कोटी रुपये रुपयांची बक्कळ कमाई केली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला तरी अजूनही हा चित्रपट तुफान गर्दी खेचत आहे. छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन केले आहे. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. तसेच, विकी कौशलच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट आहे.
'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत १९७.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने सातव्या दिवशी १७.६१ कोटी रुपये कमावले आहेत. यासह,आता या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता २१५.३६ कोटी रुपये झाले आहे.
उरी: द सर्जिकल स्ट्राईक - २४५.३६
छावा - २१५.३६
राजी - १२३.८४
सॅम बहादूर - ९२.३८
जरा हटके जरा बचके - ८८
आजपर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऐतिहासिक हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर सिंगचा 'पद्मावत' पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजय देवगणचा 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' आहे तर या यादीत विकी कौशलचा 'छावा' तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.