Cordelia Cruise Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा खूपच रडला; माजी नार्कोटिक्स अधिकाऱ्याचा पुस्तकात खुलासा

माजी नार्कोटिक्स अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात या प्रसंगाचा खुलासा केला आहे.
Cordelia Cruise Drugs Case
Cordelia Cruise Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा खूपच रडला; माजी नार्कोटिक्स अधिकाऱ्याचा पुस्तकात खुलासाfile photo
Published on: 
Updated on: 

bollywood star son broke down questioned probe in drugs case ex narcotics officer in book

पुढारी ऑनलाईन : क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाला अश्रू अनावर झाले होते. आपल्यावर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जसाठी आर्थिक मदत करणारा असल्याचा ठपका ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्याने केला होता. माजी नार्कोटिक्स अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात या प्रसंगाचा खुलासा केला आहे.

Cordelia Cruise Drugs Case
६१व्या वर्षी तरुण अभिनेत्रींशी रोमान्सवर शाहरुख खान स्पष्टच बोलला; अभिनेत्रीला विचारले, ‘गृहपाठ पूर्ण केला मुली?’

२०२१ मधील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी अधिकारी संजय कुमार सिंह यांनी या प्रकरणातील एका भावनिक प्रसंगाचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमधील एका सुपरस्टारच्या मुलासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख त्यांनी आपल्या आगामी 'कोड ऑफ ऑनर' (Code of Honour) या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक शनिवारी प्रकाशित होणार आहे.

संजय कुमार सिंह हे त्यावेळी एनसीबीचे उपमहासंचालक होते. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांच्या पुस्तकातील उल्लेखानुसार, संबंधित तरुणाने अटकेदरम्यान आपल्यासोबत झालेल्या वागणुकीबद्दल आणि ड्रग्ज तस्करीच्या कटात अडकवण्याच्या कथित प्रयत्नांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

त्याने सिंह यांना म्हटले होते, 'सर, आपने तो मुझे इंटरनॅशनल ट्रॅफिकर बना दिया, आपने मुझे ड्रग फायनान्सर बना दिया, क्या यह ठीक है जी? मेरे पास से तो ड्रग भी नहीं मिला था एनसीबी को.' म्हणजेच, 'सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि ड्रग्जसाठी आर्थिक मदत करणारा बनवले. हे कितपत योग्य आहे? एनसीबीला माझ्याकडून कोणतेही ड्रग्जही सापडले नव्हते.'

Cordelia Cruise Drugs Case
Diljit Dosanjh Concert : 'बॉम्ब फेकाल, तरीही माझ्याकडून प्रेमच मिळेल', धमक्यांच्या सावटात मुंबईत कॉन्सर्ट, दिलजीतचा प्रेमाचा संदेश

व्यक्तीचे नाव नमूद केले नाही

सिंह यांनी आपल्या पुस्तकात संबंधित व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. त्यांनी त्याचा उल्लेख केवळ 'सेलिब्रिटीचा मुलगा' असा केला आहे. मात्र, हा उल्लेख अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याबद्दल असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर २०२१ मध्ये या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती.

सिंह यांनी पुस्तकात लिहिले आहे की, संपूर्ण प्रसंग सांगताना सेलिब्रिटीच्या मुलाला अनेकदा अश्रू अनावर झाले. त्याच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. तपासादरम्यान आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये झालेल्या चर्चेमुळे त्याच्यावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला होता, हे स्पष्टपणे जाणवत होते.

SIT च्या तपासात अनेक त्रुटी उघड

या प्रकरणाच्या नव्याने केलेल्या तपासानंतर एनसीबीने आर्यन खानसह अन्य पाच जणांविरोधातील आरोप मागे घेतले. तर मे २०२२ मध्ये १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. मूळ तपासात पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेत त्रुटी आणि काही प्रक्रियात्मक चुका झाल्याचेही एसआयटीच्या तपासात समोर आले. हा मूळ तपास एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता.

सिंह यांनी लिहिले आहे की, क्रूझ जहाजाला दिलेली भेट आणि छापेमारीत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर ते समाधानी नव्हते. जप्तीची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ किंवा छायाचित्रांच्या माध्यमातून नोंदवण्यात आली होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या कारवाईला सुरुवात होण्यामागे कारणीभूत ठरलेल्या गुप्त माहिती देणाऱ्याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती मागितली.

'संपूर्ण प्रक्रियेचे योग्य दस्तऐवजीकरण नसणे आणि प्रक्रियेबाबत स्पष्टता नसणे, यामुळे माझ्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या,' असे सिंह यांनी पुस्तकात नमूद केले आहे. गुप्त माहिती देणाऱ्या व्यक्तीला अधिकृत साक्षीदार बनवण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुप्त माहिती देणाऱ्याची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी सामान्यतः अशा व्यक्तींना साक्षीदार केले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर एसआयटीने साक्षीदार आणि आरोपींचे जबाब नोंदवताना अनेक विसंगती आणि परस्परविरोधी दावे आढळल्याचे नमूद केले.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानच्या मोबाईलमधून मिळालेल्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये परदेशात ड्रग्ज सेवन केल्याचे उल्लेख होते. मात्र, ड्रग्जची तस्करी किंवा जवळ बाळगल्याचे पुरावे त्यातून समोर आले नव्हते. याशिवाय, मोबाईल फोन जप्त करण्याची प्रक्रियाही योग्य पद्धतीने पार पडली नव्हती. ड्रग्ज सेवन केले होते की नाही, हे निश्चित करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती.

खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचा निष्कर्ष

या सर्व बाबींच्या आधारे आर्यन खानविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे साहित्य किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नसल्याचा निष्कर्ष एसआयटीने काढला, असे सिंह यांनी पुस्तकात लिहिले आहे. तसेच तपास कोणत्या विशिष्ट दिशेने करावा, यासाठी पथकावर कोणताही दबाव नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

CBI मधील वादग्रस्त काळाचाही पुस्तकात उल्लेख

या पुस्तकात संजय कुमार सिंह यांनी केंद्रीय अन्वेषण विभागातील (CBI) २००८ ते २०१५ या कार्यकाळातील काही कठीण प्रसंगांचाही उल्लेख केला आहे. सीबीआयचे तत्कालीन संचालक रंजीत सिन्हा यांच्याशी संबंधित वादाचा उल्लेखही त्यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या व्यक्तींनी सिन्हा यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

या प्रकरणात सीबीआयची बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, सिन्हा यांचा बचाव केल्यास पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व या तत्त्वांशी तडजोड होईल, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांची गुवाहाटी येथे बदली करण्यात आली, असे सिंह यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.