पुढारी ऑनलाईन डेस्क : किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. ते आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचे प्रसिद्ध मठाधिपती. तसेच लाखो भक्तांच्या हृदयात त्यांनी घर केले आहे. किर्तनकाराचा वारसा लाभलेले पुरुषोत्तमदादा आजच्या तरुणांचे मार्गदर्शक आहेत. आपल्या कलेच्या आणि विचारांच्या बळावर दादांनी आता 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केला आहे. (Bigg Boss Marathi)
दादांच्या कीर्तनातून प्रकट होणाऱ्या संदेशामुळे त्यांचे भक्त त्यांच्या प्रत्येक शब्दाला अनुकरण करतात. अशा प्रभावी व्यक्तिमत्वाने 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केल्याने, हा शो निश्चितच एका नवीन दिशेने जाणार यात काही शंकाच नाही. दादा त्यांच्या प्रवासाबद्दल म्हणाले, "मी सर्वसामान्य घरातून आलो आहे. परंतु वारकऱ्यांची कीर्तनाची परंपरा मी पुढे चालवली आहे. माणूस एकांताला खूप घाबरतो. पण तसं पाहायला गेले. तर हाच एकांत मला 'बिग बॉस'च्या घरात वाटतो.. कारण बिग बॉसच्या घरात आपण एकटे असतो म्हणून मी तिकडे जात आहे."
माझ्या मित्रांनी आणि घरच्यांनी जेव्हा माझा 'बिग बॉस'मध्ये जाण्याचा निर्णय ऐकला, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्याचे कारण म्हणजे एका कीर्तनकाराने अशा मनोरंजनाच्या प्लॅटफॉर्मवर जाणे थोडे अनपेक्षित आहे. पण याबद्दल मी त्यांना म्हणालो, "बिग बॉस मराठीच्या घरात गेल्यावर भांडणच होतात, अशी लोकांची मानसिकता झाली आहे. एका कीर्तनकाराने अशा व्यासपीठावर जावे, असा प्रश्न लोकांना पडणारच. पण मला असे वाटते की, वारकरी संप्रदायाचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'बिग बॉस' हा उत्तम पर्याय आहे. मला जर 'बिग बॉस'च्या घरात काही घेऊन जाण्याची संधी मिळाली तर मी माझे आध्यात्मिक ग्रंथ घेऊन जाईन. तसेच 'बिग बॉस'मध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी शेवटचा कॉल माझ्या बाबांना केला. माझ्या आजोबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांना जाऊन १२वर्षे झालीत आणि त्यांची पुण्यतिथी याच कालावधीत येते. त्यामुळे माझ्या बाबांना दुःख होते की यावेळी मी तिथे नाही.. त्याच बरोबर मला एवढी मोठी संधी मिळाली याचा आनंद देखील होताच आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढील प्रवास सुरू केला".
रितेश देशमुख यांच्याबद्दल बोलताना दादा म्हणाले की ,"रितेश देशमुख हे नाव समोर आल्यावर मला माऊली हा शब्द समोर आला. कारण माऊलीशी मी खूप जवळचा आहे. माझ्या हातामध्ये ब्रेसलेट आहे ते देखील माऊलीचे आहे तसेच हातावर टॅटू काढला आहे तो देखील माऊलीचाच आहे आणि सर्वात महत्त्वाचे मी माऊलीच्या गावातला आहे. रितेश देशमुख यांना पहिल्यानंतर मी माऊलीमय झालो".
पुरुषोत्तमदादा पुढे म्हणाले,"घरातल्या कामाबद्दल सांगायचे झाले तर मला जेवण बनवता येत नाही. पण बाकीचे काम मी करणार. माझ्यातील स्ट्राँग पॉईंट असा की, एखादी गोष्ट मला पाहिजे असेल तर मी ती मिळवणारच.. आणि विकनेस बघायला गेलो तर मी खूप भावनिक आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन मी जिंकावा अशी माझी इच्छा आहे".
पुरुषोत्तमदादा पाटील यांचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास प्रेक्षकांना कसा वाटतो आणि त्यांच्या कीर्तनाच्या परंपरेचा प्रभाव कसा पडतो, हे पाहाणे रोमांचक ठरणार आहे.