पुढारी ऑनलाईन डेस्क : मैत्री म्हटलं की मजा, मस्ती आणि भांडण हे आलंच. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठवड्याभरातच घरातील सदस्यांमधील मैत्रीचं नातं अलगद फुलताना दिसून येत आहे. आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होत असून रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील 'फ्रेंडशिप डे' साजरा होणार आहे. नव्या मैत्रीची नवीन समीकरणं पाहायला प्रेक्षकांनादेखील आवडेल. (Bigg Boss Marathi )
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बरंच काही बोलताना दिसून येतात. पण आज रितेश भाऊने त्यांना आमने-सामने उभं केलेलं पाहायला मिळेल. तसेच त्यांच्या मनातील पोलदेखील खोलेल. फ्रेंडशिप डेनिमित्त 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर 'दोस्तीत कुस्ती आणि फुल ऑन मस्ती' पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा फ्रेंडशिप डे स्पेशल प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट एकमेकांना देत 'मैत्री दिन' साजरा करताना दिसत आहेत. भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबलढोलकी मित्र, असे वेगवेगळे लॉकेट सदस्य त्यांच्या मित्रांना घालताना दिसून येणार आहेत.
प्रोमोमध्ये योगिता घनश्याम दरवडेला 'डबलढोलकी मित्र' हे लॉकेट देताना दिसून येत आहे. त्यावर घनश्याम म्हणतो, "बघितलं ग्रुपची ताकद किती असते". यावर योगिता म्हणते,"कृपया मला बोलू द्या". तर घनशाम म्हणतो,"बोला.. आठ दिवस बोलली नाही...आता बोला".