Bads of Bollywood Controversy
मुंबई - शाहरुख खानच्या रेड चीलीज एंटरटेनमेंट निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘Bads of Bollywood’ या डॉक्युमेंटरी सिरीजवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या मालिकेत स्वतःची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप करत माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका स्वीकारत दिल्ली हायकोर्टाने रेड चीलीज आणि नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना येत्या ७ दिवसांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘Bads of Bollywood’ या सिरीजमध्ये बॉलिवूडमधील काही वादग्रस्त प्रकरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात आर्यन खान ड्रग्ज केसचाही उल्लेख आहे, ज्यात समीर वानखेडे हे तपास अधिकारी होते. याच प्रकरणामुळे शाहरुख खानच्या रेड चीलीज कंपनीचा या सिरीजशी संबंध असल्याने आता प्रकरण अधिकच गाजत आहे.
नेटफ्लिक्स आणि रेड चीलीजला नोटीस जारी करण्यात आली असून येत्या ७ दिवसांत सर्व पक्षकारांनी उत्तर द्यावं, असे दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत.
समीर वानखेडे यांनी शोचे निर्माता यांच्यावर मानहानीचा दावा केला होता. आपली प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं दाखविली गेली. यामुळे तपास यंत्रणेच्या मनोबलावर परिणाम होईल, असे म्हटले होते.
वानखेडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, या मालिकेत त्यांच्या भूमिकेचे चुकीचे चित्रण करण्यात आले असून त्यातून जनतेमध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, वानखेडे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला होणार आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, “सर्व पक्षांनी आपले उत्तर लेखी स्वरूपात ७ दिवसांत सादर करावे, त्यानंतर पुढील आदेश देण्यात येतील.”
समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्रुझवरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आर्यनने बॅड्स ऑफ बॉलिवूड या सीरीजमधून दिग्दर्शनात पाऊल ठेवले. या सीरीजमध्ये समीर वानखेडेंशी संबंधित काही दृश्ये आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यातील काही सीन्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले, ज्यामुळे समीर वानखेडे यांनी संताप व्यक्त केला.
यानंतर समीर वानखेडे यांनी नेटफ्लिक्सच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या विरोधात २ कोटींची मानहानीची याचिका दाखल करून नुकसान भरपाई मागितली होती. पण, कोर्टाने आर्यन खानची सीरीज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ विरुद्ध दाखल केलेल्या २ कोटी रुपयांच्या मानहानीच्या खटल्यात त्यांना तात्काळ अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.