

मुंबई - ‘बाहुबली: द बिगिनिंग’ दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर हा झळकणार आहे. पण यावेळी बाहुबलीचे दोन्ही भाग एकत्रितपणे पाहता येणार आहे. ‘बाहुबली’ पुन्हा एकदा सिनेमा हॉलमध्ये येतोय. त्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ ही तारीख जाहीर करण्यात आलीय.
या खास प्रसंगानिमित्त मेकर्सनी ‘बाहुबली: द एपिक’ या ग्रँड रिलीजची घोषणा केली आहे. यावेळी प्रेक्षकांना दोन्ही भाग एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ही मोठी घोषणा दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. त्यांच्यासोबतच इतर मेकर्सनीही त्यांच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली.
एस. एस. राजामौली यांनी लिहिलं आहे- बाहुबली…अनेक प्रवासांची सुरुवात, अमूल्य आठवणी, आणि कधीही न संपणारी प्रेरणा. १० वर्षं पूर्ण झाली. हा खास क्षण साजरा करतोय #BaahubaliTheEpic च्या रूपात दोन्ही भाग एकत्र करून एका चित्रपटाच्या रूपात. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी, जगभरातील सिनेमा हॉल्समध्ये!"
फक्त महिष्मतीचं साम्राज्य नव्हे, तर प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज आणि नासर यांसारखी तगडी स्टारकास्ट भारतीय प्रेक्षकांना मिळाली. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. आजही हा चित्रपट तेलुगूतील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट ठरला आहे. शिवाय हिंदी डब्ड व्हर्जनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा डब्ड चित्रपट ठरला आहे. आता बाहुबली: द एपिकची ग्रँड रिलीज जवळ येते आहे, त्याची प्रतीक्षा लागून राहिली.