

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगण हा बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच या वर्षी रिलीज झालेल्या रोहित शेट्टी दिग्दर्शित त्याच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला.
आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती त्याच्या बहुचर्चित आजाद चित्रपटाची. नुकतेच अजय देवगणच्या 'आजाद' या चित्रपटाचे 'आजाद है तू' हे टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. अजय देवगणच्या या टायटल ट्रॅकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. या गाण्याला आत्तापर्यंत काही तासातच लाखो व्हूज मिळाले आहेत.
भुवनेश्वरमधील DAV युनायटेड फेस्टमध्ये रविवारी अमन देवगण, राशा थडानी, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रज्ञा कपूर यांच्यासोबत तब्बल 20,000 लोकांच्या उपस्थितीत या गाण्याचे अनावरण करण्यात आले.
हे गाणे प्राणी आणि त्यांच्या जवळ असणा-या अतिप्रिय लोकांचे पवित्र बंधन दर्शवते. 'आजाद'मध्ये अजय देवगण एका गावकऱ्याच्या भूमिकेत चमकताना दिसत आहे. या गाण्यातून आजादवरील प्रेम आणि हृदयस्पर्शी संगीत हृदयाला भिडणारा अनुभव देते.
वृत्तानुसार, गाण्याबद्दल बोलताना, दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाला की , “आजाद है तूचे सार म्हणजे प्राणी आपल्या जीवनात जे शुद्ध प्रेम आणि निष्ठा आणतात ते दाखवणे. आम्हाला या नातेसंबंधाची खोली दाखवायची होती तसेच प्राणी आपल्या रक्षकांचे संरक्षण करण्यासाठी किती प्रयत्न करतात हे दाखवायचे होते. ‘आजादा है तू’ हे आजादच्या भावना आणि भावनांचे उत्तम मिश्रण आहे.
चित्रपटातील हे गाणे बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगने गायले आहे. अमित त्रिवेदी यांनी या गाण्याला संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. अमन देवगण आणि राशा थडानी अभिषेक कपूर दिग्दर्शित 'आजाद'मधून पदार्पण करत आहेत. या चित्रपटात अजय देवगण सोबतच डायना पेंटी यांचीही दमदार भूमिका आहे . हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.