

नवी दिल्ली : भारत सरकारच्या वतीने पद्मश्री हा सन्मान म्हणजे आजवरच्या माझ्या कष्टाचे चीज आहे, असे मी मानतो. हा पुरस्कार खूप मोठा आहे. मी आजवर केलेल्या कामाची पावती मिळाली आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. तसेच सीमेवरचे जवान हे खरे हिरो आहेत, असेही ते म्हणाले.?
बुधवारी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर गुरुवारी अशोक सराफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अशोक सराफ यांनी त्यांच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. अशोक सराफ म्हणाले की, कॉमेडीसह आपल्या एकूण कामामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू येईल, लोकांना जास्तीत जास्त आनंद होईल, अशी काम करायची माझी कायम इच्छा राहिली आणि मी ते साध्य करू शकलो, असे मला वाटते.
ऑपरेशन सिंदूरबाबत विचारले असता अशोक सराफ म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे लोक समाधानी आहेत, लोकांना दिलासा मिळाला. तसेच सीमेवरचे जवान आणि अशा ऑपरेशनच्या वेळी लढणारे जवान हे खरे हिरो आहेत, आम्ही पडद्यावरचे हिरो आहोत, पडद्यावर काम करतो. ते आहोत म्हणून आपण आहोत, असेही ते म्हणाले.
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी आम्ही सराफ कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित होतो, डोळ्यात आनंदाश्रू होते. अशोक सराफ नेहमी म्हणतात की, त्यांच्या सर्व पुरस्कारांमध्ये सर्वात मोठा मोठा वाटा हा त्यांच्या प्रेक्षकाचा आहे. प्रेक्षकांनी कायम त्यांच्यावर खूप प्रेम केले, डोक्यावर घेतले. एक कलाकार कितीही काम करत असला तरीही ते काम बघणारे प्रेक्षक त्याला मोठे करत असतात.
निवेदीता सराफ (अभिनेत्री आणि अशोक सराफ यांच्या पत्नी)