

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समुदायावर वादग्रस्त विधानानंतर माफी मागितली आहे. शुक्रवार उशीरा रात्री त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून माफी मागितली आहे. त्याने लिहिलंय-मी माफी मागतो, पण ही मी माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका वाक्यासाठी मागत आहे. ते खूप चुकीच्या पद्धतीने घेतले गेले आणि द्वेष पसरवण्यात आला. “कोणतेही विधान माझ्या कुटुंबापेक्षा, विशेषतः माझ्या मुलीपेक्षा महत्त्वाचे नाही. आज मला धमक्या येत आहेत, बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या. आणि हे सर्व ते लोक करत आहेत, जे स्वतःला ‘संस्कारी’ म्हणवतात. जर राग काढायचा असेल, तर माझ्यावर काढा. मला शिव्या द्या, पण माझ्या कुटुंबाला यात ओढू नका.” असंही त्याने नमूद केलं.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका युजरला उत्तर देताना त्यांनी ब्राह्मण समुदायाविरोधात एक अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप झाला. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला, आणि अनेकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
या साऱ्या वादानंतर अनुराग कश्यपने उशीरा का होईना, इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत माफी मागितली. मात्र ही माफी देखील पूर्ण नव्हती, असे अनेकांचे मत आहे. कश्यपने लिहिले, “मी माफी मागतो, पण माझ्या पूर्ण पोस्टसाठी नाही. मी फक्त त्या एका वाक्यासाठी माफी मागतो आहे, जे चुकीच्या पद्धतीने समजले गेले. माझ्या विधानाचा उद्देश जातीय तेढ वाढवण्याचा नव्हता.”
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत – काही जण कश्यपच्या बाजूने बोलत आहेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करत आहेत, तर काहींना वाटते की, सार्वजनिक व्यक्तिमत्वांनी त्यांच्या शब्दांची अधिक जबाबदारीने निवड करायला हवी. विशेषतः जातीय विषयांवर बोलताना संवेदनशीलता ठेवणे गरजेचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट ‘फुले’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्याचे विधान आणि त्यावरून झालेला वाद काही प्रमाणात चित्रपटाच्या प्रसिद्धीला झळ पोहोचवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.