
पुढारी ऑनलाईन डेस्क - बिग बॉस मराठी ५ फेम अंकिता वालावलकरने म्युझिक डायरेक्टर कुणाल भगतशी विवाह केला. दोघांचे लग्न १६ फेब्रुवारीला कोकणात पार पडले. कोकणातील एका मंदिरात तिने लग्नसोहळ्याचे विधी केले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ज्या मंदिरात त्यांचा लग्नसोहळा झाला, ते मंदिर खूप सुंदर तर आहेच शिवाय गावदेखील तितकचं निसर्गरम्य आणि हिरव्यागार गर्द झाडीने नटलेले आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावात हे लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात अंकिता-कुणालचा विवाहसोहळा पार पडला.
वालावल गाव आणि लक्ष्मी-नारायण या मुख्य मंदिराविषयी तुम्हाला माहितीये का? कोकण फिरताना या वालावल गावात तुम्ही नक्की जा! कोकणाच्या सौंदर्याची आणखी एक बाजू तुम्हाला अनुभवता येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'वालावल' हे खूप सुंदर आणि गर्द झाडीने वेढलेलं ठिकाण आहे. वेंगुर्ल्यापासून हे अंतर जवळ आहे. एका दिवसाच्या किंवा दोन दिवसांचा ट्रीप प्लॅनदेखील तुम्ही करू शकता. वालावल माडांच्या बनांनी वेढलेला हिरवागार रस्ता कोकणात आल्याचं फिल अप्रतिम देतो. केळी, सुपारीच्या बागा, पोफळी आणि बांबूची सभोवतालने जंगल आणि शांतता अशी वालावलची खासियत.
ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक पश्चिम वाहिनी नदी असून तारकर्ली येथे अरबी समुद्रास मिळते. वालावलमध्येच कर्ली नदी आहे. या नदीचे पाणी जानेवारी ते जूनपर्यंत खारे होते. पावसाळ्यात जुलैपासून डिसेंबर पर्यंत नदीचे गोड पाणी होते. कुडाळ तालुका आणि मालवण तालुका यांना अलग करणाऱ्या कर्ली नदीचा परिसर असंख्य हिरवेगार झाडे, विविध वनस्पती, फुले, पक्षांनी समृद्ध आहे. या नदीमध्ये जर तुम्हा सफर करायला मिळाली तर? व्वा! क्या बात है. मग नक्कीच वालावलच्या कर्ली नदीची होडी सफर तुम्ही अनुभवा.
नावाडी काही अंतरावर मोटारीने आणि नंतर वल्हे हाकत नदीची सफर घडवून आणतो. एका बाजूला खारफुटी, कांदळवन तर दुसऱ्या बाजूला अगणित पक्षी पाण्यात डोकावून पाहताना तुम्हाला दिसतील. १०० ते २०० रुपयांमध्ये होडीचा नदीतील प्रवास अनुभवता येतो.
वालावल हे गाव घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. अशा निसर्गातील एक सुंदर ठिकाण म्हणजे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर. मंदिराच्या आसपासचे निसर्गदृश्य व शांतीमय वातावरण पर्यटकोंसाठी एक आकर्षण ठरते. हे ठिकाण भक्तांसोबतच निसर्ग प्रेमींसाठी देखील एक सुंदर स्थल आहे. सूर्यभान आणि चंद्रभान प्रभु-देसाई बंधूंनी १४ व्या शतकाच्या सुरुवातीला हे पूर्वमुखी मंदिर बांधले गेल्याचे म्हटले जाते. हे मंदिर सुख समृद्धी आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. मंदिराला लागून एक मोठे तलाव आहे, जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यास लक्ष्मी नारायण तळे म्हटले जाते. कमळांनी फुललेले हे तलाव आहे. मंदिर परिसारत रवळनाथ मंदिर, घोडसदेव मंदिरे आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार इतके सुंदर आहे की, पाहणाऱ्यांचे पाय आपसुकचं मंदिराकडे वळतात.
प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोरचं तीन सुंदर आणि उंच दीपमाळा आहेत. मंदिराची वास्तुकला हेमांडपंथी आहे. मंदिरासमोर लागून एक हॉल आहे, जिथे दशवतार, कीर्तन आणि भजन गायले जाते. मंदिरातील अनेक कलाकुसर सागवान लाकडापासून केलेले आहे.
काळ्या पाषाणावरील अगदी बारीक कलाकुसर, रामायणातील दृश्ये, अप्सरा, गणपती, शंकर-पार्वती, नर्तकी, वाद्ये वाजवणाऱ्या नर्तिका, शस्त्रे, युद्धातील प्रसंग, शस्त्रे चालवणाऱ्या स्त्रिया, पक्षी, फुले अशा अनेकविध गोष्टी विविध खांबांवर कोरलेले आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या छतावर देखील कोरीव काम केलेले आहे. मुख्य दरवाजा कमी उंचीचा असून त्यावर कमळाच्या फुलांचे कोरीव काम आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच 'आदिपंढरी' म्हणून ओळखले जाते.
वेंगुर्ला-बागायत चौके रोड-लोखंडेवाडी-नारायण टेम्पल रोड-वालावल
वालावलला राहण्यासाठी अनेक सुंदर रुम्स उपलब्ध आहेत. हॉटेल, आणि स्वतंत्र बंगल्यांचीदेखील सोय आहे. अनेक निवासस्थाने गर्द झाडांच्या छायेत गारवा देणारी आहेत. अधिक तापमानात जरी याठिकाणी गेला तरी गारवा अनुभवता येईल, असे हे ठिकाण आहे.
कोकणात आलाय तर मच्छीवर ताव मारायलाचं हवा. सुरमई मच्छी, कोळंबी, बांगडा, मच्छीकरी, चिकन, अंडाकरी, सुकी बोंबील, गोलमा, कोकम, सोलकडी, घावणे-चटणी, शहाळ्याचा रस, तांदळाचे पापड, तांदळाचे उकडी मोदक, उकडी पातोळ्या.
आरावकर गणेश मंदिर, श्री देव कालेश्वर मंदिर, काळसे बेट, कुपीचा डोंगर, श्रीदेव रवळनाथ पंचायतन मंदिर.