

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची गरज आहे, अशी मागणी मनसे चित्रपट सेनेने केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही सरकारने याची दखल घेतलेली नाही. त्यासंदर्भात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक एक्स ट्विट केले आहे.
मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची नितांत आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही मागणी होत आहे. पण सरकारने याची दखल घेतलेली नाही. मराठी चित्रपट निर्मात्यांची नेमकी काय मागणी आहे, यासंदर्भात सविस्तर निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देत आहोत. महाराष्ट्र शासनाला या गंभीर विषयावर तातडीने विचार करुन शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याची आमची विनंती आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मराठी चित्रपटांना दिली जाणारी वागणूकही चीड आणणारी आहे. सेन्सॉर बोर्डाकडून होणाऱ्या विलंबामुळे मराठी चित्रपटांचं नुकसानच होत आहे. केवळ स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा सामना गेली अनेक वर्ष निर्मात्यांना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने याबद्दल गांभीर्यपूर्वक विचार करावा.