

आवारापन २ मधील 'ये आवारापन' या गाण्याला मिळणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांनंतर अमाल मलिक याने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली. चित्रपटसृष्टीतील काही प्रतिस्पर्धी गट चित्रपट आणि गाण्याविरोधात 'Paid PR' मोहीम राबवत असल्याचा आरोप त्याने केला. तसेच, ओरिजिनल आवारापनच्या गाण्यांशी तुलना करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी प्रेक्षकांना गाणे मनापासून ऐकून मत बनवण्याचे आवाहन केले.
Amaal Mallik cryptic note on Awarapan-2 song
संगीतकार आणि गायक अमाल मलिकने त्याच्या आगामी 'आवारापन २' चित्रपटातील 'ये आवारापन' या नव्या गाण्याविरोधात नियोजित 'पेड पीआर' मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर त्याने एक मोठी नोट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यावे काही विरोधी गट जाणीवपूर्वक गाण्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
अमालने लिहिले की, 'ये आवारापन' या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल तो मनापासून आभारी आहे. प्रत्येक गाण्याला श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी संयम आवश्यक असतो, असेही त्याने नमूद केले.
याच पोस्टमध्ये त्याने चित्रपटसृष्टीतील काही लोकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्याच्या मते, काही विरोधी गट मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून गाण्याविरोधात नकारात्मक वातावरण तयार करत आहेत. "ज्यांना हा चित्रपट किंवा त्यातील संगीत यशस्वी व्हावे असे वाटत नाही, ते अशा मोहिमा राबवत आहेत. माझा त्यांना एकच सल्ला आहे, हे पैसे माझ्या गाण्यावर खर्च करण्यापेक्षा तुमच्या पुढील चित्रपटांसाठी जपून ठेवा."
अमाल मलिकने 'आवारापन २' आणि २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आवारापन' चित्रपटाच्या मूळ गाण्याशी होत असलेली तुलना देखील फेटाळली.
आवारापन'च्या मूळ संगीतावरही अमाल मलिकचे स्पष्टीकरण
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अमाल मलिकनी 'आवारापन' चित्रपटाच्या मूळ संगीताबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भूमिका स्पष्ट केली. त्याने म्हटले की, पहिल्या 'आवारापन' चित्रपटातील सर्व गाणी पूर्णपणे मूळ रचना नव्हती. आधीपासून लोकप्रिय असलेल्या काही इंडी-पॉप गाण्यांना चित्रपटासाठी नव्या धाटणीत सादर केले होते.
अमालच्या मते, 'तो फिर आओ', 'तेरा मेरा रिश्ता', 'मौला मौला' आणि 'महिया' यांसारख्या गाण्यांचे मूळ अस्तित्व आधीपासून होते. चित्रपटाच्या कथेनुसार आणि वातावरणाला साजेसे बनवण्यासाठी त्याला नव्याने संगीत देण्यात आले.
यासोबतच अमाल मलिकने श्रोत्यांना तुलना टाळण्याचे आवाहन केले. "तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. कोणत्याही गाण्याबद्दल मत बनवण्यापूर्वी ते मनापासून आणि पूर्वग्रह न ठेवता ऐका. त्यानंतरही आवडले किंवा आवडले नाही, तर तुमचे मत जरूर मांडा," असे तो म्हणाला.
पोस्टच्या शेवटी अमाल मलिकने भावनिक संदेश लिहिला. "ज्यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत नाही, त्यांनाच 'पेड पीआ'ची गरज भासते. माझ्यावर आणि माझ्या संगीतावर विश्वास ठेवणाऱ्या श्रोत्यांचे प्रेमच माझी खरी ताकद आहे. जर 'ये आवारापन'मधील भावना तुम्हाला जाणवत असतील, तर बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि संगीताचा आनंद घ्या," असे त्याने म्हटले.