पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. किंग खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल (बुधवार) दुपारी डिहायड्रेशनमुळे शाहरूखला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डिस्चार्जनंतर शाहरुख मुंबईत पोहोचला आहे.
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने शाहरुख खानच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले होते. किंग खानच्या मॅनेजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, शाहरुखची तब्येत आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. शाहरुखच्या सर्व हितचिंतक आणि चाहत्यांना सांगू इच्छिते की त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. तुमच्या सर्व प्रेम, प्रार्थना आणि काळजीबद्दल धन्यवाद.
शाहरुख खानला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी येताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. शाहरुख 21 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याचा संघ कोलकाता नाइट रायडर्स आणि हैदराबाद सरायझर्स यांच्यातील सामना पाहत होता. या सामन्यात आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख दोन दिवस अहमदाबादमध्ये राहिला. कोलकाताने सामन्यात विजयही मिळवताच तोही पूर्ण उत्साहात मैदानात उतरला, मात्र डिहायड्रेशनमुळे त्याची प्रकृती बिघडली.
यानंतर शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुख २४ तास रुग्णालयात दाखल होता. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरुखसोबत पत्नी गौरी खान आणि बिझनेस पार्टनर अभिनेत्री जुही चावलाही उपस्थित होत्या. काल शाहरुखच्या तब्येतीचे अपडेट देताना जुहीने त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले होते.
अभिनेत्याची ढासळलेली प्रकृती पाहून चाहते खूपच चिंतेत पडले आणि त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. दरम्यान, शाहरुखचा एक व्हिडिओही व्हायरल होत होता. जेव्हा शाहरुख अस्वस्थ वाटत असल्याने स्टेडियममधून बाहेर पडत होता. तेव्हा त्याने दिव्यांग चाहत्याशी हस्तांदोलन केले, त्यांना मिठी मारली, अभिवादन केले आणि त्याची तब्येत विचारली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्याचे कौतुक करत होते.