

अभिनेत्री ऋतुजा बागवेने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहेच. पण आता हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून तिने पोटात जागा मिळवण्याचेही ठरवले आहे. ऋतुजा नुकतीच बिझनेसवुमन बनली आहे. ऋतुजाने हॉटेलिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याच्या हस्ते तिने आपल्या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले आहे. अंधेरी पूर्व मरोळ भागात तिने 'फुडचं पाऊल' या नावाने नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. (Latest Entertainment News)
तुम्हा सर्वांच्या प्रेमावर विश्वास ठेवून, माझ्या माणसांना घेऊन, नव्या व्यवसायात पुढचं पाऊल टाकतेय…‘फूडचं पाऊल- व्हेज- नॉनव्हेज रेस्टॅारंट. नक्की भेट द्या..! आम्ही आदरातिथ्यासाठी वाट पाहतोय हे कॅप्शन देत तिने आपल्या नव्या रेस्टॉरंटबाबत शेयर केले आहे.
तिच्या या नव्या व्यवसायाला सिनेसृष्टीतील तिच्या कलाकार मित्रांनीही अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री अश्विनी महंगडे, सोनाली खरे, शर्मिला शिंदे, पूर्वा कौशिक, प्रताप फड, रासिका वेंगुर्लेकर, भागयश्री मिलिंद, अक्षया नाईक या कलाकारांनी ऋतुजाला यावेळी शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने ऋतुजासाठी खास पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘नवीन सुरुवात आणि चविष्ट स्वप्नांच्या पूर्तीसाठी खूप खूप अभिनंदन. ऋतुजा आणि अनुजा बागवे तुमचे रेस्टॉरंट आता सुरू होत आहे. मला अभिमान वाटतो. तर अभिनेता ओमप्रकाश शिंदेनेही खास पोस्ट करत ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘फूडचं पाऊल या पुढील पाऊलासाठी खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रभर ही पाऊले उमटोत.’ अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही इंस्टा स्टोरी शेयर करत ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री स्वप्ना पाटील हिनेही पोस्ट शेयर करत ऋतुजाच्या नव्या व्यवसायाचे कौतुक केले आहे. तर रेशमा शिंदे हिने परत भेटू लवकरच म्हणत ऋतुजाला शुभेच्छा दिल्या आहेत.