

Somnath Avghade Controversy: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सोमनाथ अवघडेने एका मराठी युट्यूब चॅनलविरोधात गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. चॅनलने “मराठवाड्यात पोरांना गोरे करणारी पाकची क्रीम, थेट किडन्या फेल करून गेली” या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या बातमीत त्याचा फोटो वापरण्यात आल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणानंतर सोमनाथ अवघडेने सोशल मीडियावर सविस्तर खुलासा करत संबंधित माध्यमाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोमनाथ अवघडे याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित बातमीमध्ये वापरण्यात आलेल्या फोटोमुळे त्याच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला. अनेकांनी त्याला फोन आणि मेसेज करून त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यालाही या प्रकरणाची माहिती नव्हती. मात्र नंतर त्याने स्वतः ती बातमी पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकार त्याच्या लक्षात आला.
या प्रकरणावर त्याने पोस्ट करुन सांगितलं की, त्याने कधीही अशा कोणत्याही क्रीमची जाहिरात केलेली नाही. तसेच भविष्यातही अशा उत्पादनांचे समर्थन करणार नसल्याचे त्याने सांगितले. एवढेच नव्हे तर, अशा कोणत्याही क्रीमचा आपण कधी वापरही केलेला नाही, असे त्याने सांगितले आहे.
सोमनाथ अवघडेने या पोर्टलवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझा फोटो कोणत्या आधारावर वापरण्यात आला? त्यासाठी माझी परवानगी का घेतली गेली नाही?” असा सवाल त्याने उपस्थित केला. संबंधित पोर्टलच्या कोणत्याही प्रतिनिधीने किंवा पत्रकाराने संपर्क साधला नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्याने सांगितले. “केवळ प्रसिद्धीसाठी माझा फोटो वापरून बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये माझ्याबाबत चुकीचा मेसेज गेला,” अशी खंत त्याने व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणात त्याने कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आपले वकील अॅड. महेश भोसले यांच्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्याने जाहीर केले.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये सोमनाथ अवघडेने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले आहे. “मी पूर्णपणे ठणठणीत आहे. माझ्या आरोग्याबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नका,” असे त्याने स्पष्ट केले. तसेच वर्णवर्चस्वाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही गोष्टींना आपण ठाम विरोध करत असल्याचेही त्याने सांगितले. या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.