

मुंबई: ९० च्या दशकात 'आशिकी' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राहुल रॉय सध्या एका कठीण टप्प्यातून जात आहे. मात्र, या संघर्षाच्या काळात काही लोकांकडून होणारी टीका आणि थट्टा पाहून राहुल रॉय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. "माझ्या साधेपणाची थट्टा करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, ते माझ्याबद्दल नाही तर तुमच्याबद्दल अधिक सांगते," अशा शब्दांत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले आहे.
प्रसिद्ध अभिनेता राहुल रॉय यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य करत पुन्हा एकदा कामासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे. मेंदूघातासारख्या (Brain Stroke) गंभीर आजारातून सावरल्यानंतर रॉय यांनी आपल्या स्वाभिमानाची आणि कष्टाची बाजू जगासमोर मांडली आहे.
राहुल रॉय यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ते आजही अत्यंत प्रामाणिकपणे आणि नम्रपणे आपले काम करत आहेत. "मी कष्टाने पैसे कमवत आहे, कोणाची थट्टा करून नाही," असे म्हणत त्यांनी आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. मेंदूघाताच्या (Brain Stroke) धक्क्यातून सावरत असतानाही काम करण्याची त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आर्थिक अडचणी आणि कायदेशीर लढा
ब्र्रेन स्ट्रोक येण्यापूर्वीच्या काही कायदेशीर बाबी आणि देणी अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. ते म्हणाले, "जर तुम्हाला खरोखरच माझी इतकी काळजी वाटत असेल, तर मला काही चांगले आणि दर्जेदार काम मिळवून देण्यासाठी मदत करा, जेणेकरून मी माझी देणी पूर्ण करू शकेन."
जिद्द कायम: 'जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत काम करणार'
आजारपणानंतर सक्रिय राहणे हे आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भाष्य केले. "काम केल्यामुळे माझे मन सक्रिय राहते आणि मला जबाबदारीची जाणीव होते. कधीकधी टीका मनाला लागते, पण तुम्ही मला तोडू शकत नाही," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राहुल रॉय यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, सिनेसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्या या जिद्दीला सलाम केला आहे. कष्ट करून सन्मानाने जगण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.