

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी, हिंदी चित्रपटातील प्रथितयश अभिनेते नाना पाटेकर यांनी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजकारणापासून राजकारणापर्यंत आपल्या बेधडक वक्तव्याने ते नेहमीच खळबळ उडवून देतात. आताही त्यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Nana Patekar)
अभिनेते नाना पाटेकर हे तापट स्वभावामुळे ओळखले जातात. परिंदा आणि खामोशी यासारख्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचा कलाकारांशी वाद झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. नुकतेच नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान मी खूप रागीट सभावाचा असून अभिनेता असल्यामुळे मला माझ्या दडपलेल्या भावना बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे. जर अभिनेता नसतो तर आज अंडरवर्ल्डमध्ये असतो, असे खळबळजनक वक्तव्य केले. तसेच हा कोणताही विनोद नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Nana Patekar)
पुढे बोलताना नाना म्हणाले, अभिनयामुळे मला एक आऊटलेट दिला. निराश मनाला नवसंजीवनी देण्याचा मार्ग बनला. मी अनेकांबरोबर हाणामारी केली असल्याचेही नाना म्हणाले. यावेळी त्यांनी 'खामोशी' चित्रपटाच्या सेटवर चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याशी झालेल्या भांडणाच्या आठवणीही सांगितल्या. (Nana Patekar)