

पुढारी ऑनलाईन डेस्क : Allu Arjun bail | तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर आज (दि.14) सकाळी 6.40 च्या सुमारास त्याची तरूंगातून सुटका झाली. अल्लू अर्जुनला तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी त्याच्या घरी जाऊन नाट्यमयरीत्या अटक केली होती.
रात्रभर तुरुंगात राहिल्यानंतर अल्लू अर्जुनची आज सकाळी सुटका झाली. त्याचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अल्लू अरविंद आणि सासरे कंचरला चंद्रशेखर अल्लू अर्जुनला घेण्यासाठी हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले होते. 'पुष्पा-२' या चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी हैदराबादमधील चित्रपटगृहात अल्लू अर्जुन उपस्थित राहिला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता; तर महिलेचा मुलगा जखमी झाला होता. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल केला होता. अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत जाहीर केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अल्लू अर्जुन याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. अल्लू अर्जुन हा अभिनेता असला, तरी त्याला वैयक्तिक आणि खासगी आयुष्य जगण्याचा अधिकार असल्याचे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. सामान्य नागरिक म्हणून जगण्याचा अल्लू अर्जुन याला हक्क आहे.