

मुंबई - अभिनेता आमिर खानकडे अलीकडेच त्याच्या मुंबईतील घरी अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. या भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रविवारी, अभिनेत्याच्या इमारतीतून बाहेर येणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बस आणि तीन पोलिस वाहनांचे व्हिडिओ सोशल मीडिया पाहायला मिळाले. एका अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, अधिकाऱ्यांनी वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानासाठी का आणि कशासाठी भेट दिली?
वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ''प्रोबेशनरी आयपीएस अधिकाऱ्यांना आमिरला भेटायचे होते. या बॅचमधील IPS प्रशिक्षणार्थी अधिकारी आमिर खान यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यामुळे आमिर खान यांनी त्यांना त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांच्याशी संवाद साधला.''
यासंदर्भात एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये अनेक IPS अधिकारी एक आलिशान बसमधून उतरून आमिर खान यांच्या इमारतीत जाताना दिसत होते. या घटनेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. काहीजण म्हणाले की, आमिर खान एखादा असा प्रोजेक्ट करीत आहेत, ज्यामध्ये सुरक्षेची गरज आहे. विशेषतः, त्याच्या काही लक्झरी कार्सबाबतच्या बातम्यांमुळे टीम चिंतेत होती. मात्र आता हे स्पष्ट झाले आहे की, आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून विविध बॅचमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींना भेटत आले आहेत. त्यांच्या 'सरफरोश' या चित्रपटानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आमिरचा १९९९ मध्ये सरफरोश चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये त्यांनी एक प्रामाणिक आणि कणखर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेमुळे अनेक आयपीएस ट्रेनी, अधिकाऱ्यांवर आमिरच्या या चित्रपटाचा खास प्रभाव आहे.
आमिर खान यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सितारे जमीन पर' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या ते या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंग्स आयोजित करत आहेत आणि लवकरच 'आमिर खान प्रॉडक्शन्स'च्या आगामी प्रकल्पांविषयी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आमिरसोबत जेनेलिया डिसुजा आणि अनेक नवे युवा कलाकार जसे अरूश दत्ता, वेदांत शर्मा, ऋषभ जैन, आणि सिमरन मंगेशकर यांनी अभिनय साकारला आहे.
'कुली’ आणि ‘लाहौर 1947’ यासारख्या चित्रपटांमध्ये आमिर खान लवकरच दिसणार आहेत. लवकरच ते साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत 'कुली' चित्रपटामध्ये दिसतील. यामध्ये ते 'दहा' ची भूमिका साकारतील. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करत आहेत. यामध्ये नागार्जुन, श्रुती हसन आणि सत्यराज यासारख्या स्टार्सच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच आमिर हे सनी देओल - प्रीती जिटा यांचा चित्रपट 'लाहौर' ची निर्मिती देखील करणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य आंदोलना दरम्यान एका संवेदनशील प्रेम कहाणीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. आमिर खान प्रोडक्शन्स बॅनर अंतर्गत हा चित्रपट तयार होत आहे.
video-viralbhayani insta वरून साभार