

चित्रपट परीक्षण : अनुपमा गुंडे
मला ना माझ्या आईसाठी, वडिलांसाठी हे करायचे राहून गेले. आज माझं हे यश पाहायला ते हवे होते...अशा देवाघरी गेलेल्या नात्यांसाठी डोळ्यांच्या कडा ओलावत असतात. नाती आणि नात्यातील माणसं आपल्या आजूबाजूला असताना आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. रोजच्या रहाटगाडग्यात पैसा, यश, प्रसिध्दीच्या मागे धावताना आपण या नात्यांचे मोल विसरतो, किंबहुना कधी-कधी ही नाती या आपल्या सो-कॉल्ड यशाच्या मार्गात अडथळा असल्याचा आपला भ्रम होतो. त्यामुळे आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी ही नाती नकळत दुखावली जातात.
परिस्थितीला दोष देत या नात्यावर अपयशाचे खापर फोडत पळवाट काढत जगण्याचा प्रयत्न करणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती असतात. पण निरपेक्ष प्रेम करणारी अशी माणसं गेल्यावरच आपल्याला त्यांची आणि त्या नात्यांची महती कळते. खरे तर, हा अनुभव कुठल्याही निरागस, निरपेक्ष प्रेम करणाऱ्या माणसांच्या बाबतीत येऊ शकतो, पण दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘आदि अनंत’ या चित्रपटाच्या माध्यमातून आजोबा आणि नातवाच्या बंधातून नात्याची गोष्ट उलगडली आहे.
आदित्य (संकर्षण कऱ्हाडे) आणि त्याचे आजोबा अनंत भालेराव (अशोक सराफ) यांच्या नात्याची ही गोष्ट. आदित्य हा एक धडपडणारा कलावंत. मालिका आणि नाटकांमधून पडेल ते काम करणारा. आज ना उद्या आपल्याला चांगली आणि मोठी भूमिका मिळेल. या आशेवर तो दिवस कंठत असतो. त्याच्या सुख-दु:खात आजोबा बरोबर सहकलाकार मिथुन (योगेश शिरसाट) वाटेकरी असतो. अशातच आजोबांच्या मित्राची नात गायत्री (सखी गोखले) त्याच्या आयुष्यात येते. दत्ताचे भक्त असलेल्या आजोबासमवेत गेल्यावर वाडीला गेल्यानंतर घडलेल्या घटनेनंतर आजोबा आणि नातवाचे आयुष्यच बदलून जाते.
ते नेमके कसे आणि आजोबाच्या नात्याची महती नातवाला कशी जाणवते, हा नात्यांचा बंध पाहण्यासाठी ‘आदि अनंत’ चित्रपटगृहात जाऊन पाहायला हवा, असा आहे. महेश लिमये यांनी दिग्दर्शनात आजोबा-नातवातल्या नात्याचे बारकावे टिपले आहेत. अशोक सराफ यांनी आजोबांची भूमिका समरसून केली आहेच, केवळ वयाला साजेशी म्हणून ते भूमिकेत उठून दिसत नाहीत तर वृध्दत्वाच्या प्रत्येक हालचाली आणि लकबीत सराफी शैलीचा स्वतंत्र ठसा आहे.
संकर्षण यांनीही एक स्ट्रलगर कलाकार, हळुवार प्रियकर आणि आजोबांच्या प्रेमाने हळवा होणारा नातू, तर कधी आजोबांच्या कर्तव्याच्या ओझ्याने होणारी घुसमटीने करिअर की नाते या द्वंद्वात अडकलेला तरुण अतिशय समर्पक उभा केला आहे. सखी गोखलेही प्रेयसीच्या भूमिकेत लक्षात राहते. कथानकाच्या अनुषंगाने कथेची गुंफण योग्य असली तरी प्रसंगानुरूप संवादाच्या आतषबाजीत चित्रपट काही प्रसंगात फुलत नाहीत. बाकी आजच्या पिढीला नात्यांचे मोल कळण्यासाठी पाहावा असा चित्रपट आहे.