जीव माझा गुंतला : अंतराला मिळणार मल्हारची साथ ! | पुढारी

जीव माझा गुंतला : अंतराला मिळणार मल्हारची साथ !

पुढारी ऑनलाईन :  छोट्या पडद्यावरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेने अल्पावधीतच सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. या मालिकेत परस्परविरोधी असलेले मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. नात्यांचा गुंता अधिकच वाढला. आता एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही म्हणजेच अंतरा आणि मल्हारची कसोटी लागतं आहे.

अंतराने अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धिराने तोंड दिले. चित्राकाकी आणि श्वेताच्या जाळ्यात अडकणार की काय असे वाटत असतानाच अंतराने स्वत:ची सुटका करून घेतली. कधी सुहासिनी मदतीला आली तर कधी आजी. या दोघींची साथ खानविलकर कुटुंबात अंतराला कायमच मिळाली असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. सत्याच्यासोबत देवदेखील असतो, असे म्हणतात ना. तसेच काहीसे अंतराबरोबर घडत आहे.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेमध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. ज्यामध्ये चित्राकाकीने अंतराला अडकवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. चित्राकाकी आणि काकाला घरामधून बाहेर काढले आणि यासगळ्यामागे अंतराचाच हात आहे, असा चित्राकाकीचा समज झाला आहे. आता अंतरालादेखील घराबाहेर कसे काढता येईल?, तिच्यासोबत सगळ्या खानविलकरांना जेलमध्ये कसे घालावता येईल? आणि सगळ्याचा ताबा कसा मिळवायचा याचा कट चित्राकाकी आणि काका रचताना दिसणार आहेत. एकिकडे चित्राकाकी अंतराला ड्रग्सच्या केसमध्ये अडकवण्याचा प्लॅन करताना दिसणार आहे.

दुसरीकडे, मल्हारला काका आणि काकीच्या प्लॅनबद्दल कोणीतरी माहिती देताना दिसणार आहेत. आता या सगळ्यामधून अंतरा कशी वाचणार?, मल्हारची साथ अंतराला मिळणार का?, अंतरावर मल्हार विश्वास ठेवणार का?, आता मल्हार अंतराला यातून सुखरूप सोडवू शकेल का? की चित्राकाकीने रचलेल्या या सापळ्यात अंतरा अडकेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली, सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती अशा अंतरावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा किंवा हळवा अजिबात नाही. इतक्या वेगळ्या स्वभावाचा असलेल्या मल्हारने देखील चाहत्यांची पसंती मिळविली आहे.

”जीव माझा गुंतला’ या मालिकेत अंतरा आणि मल्हार म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकांचे विचार आहेत. कोल्हापूरच्या रिक्षावालीची भूमिका करण्याची संधी मला मिळाली आहे. तशी ही संधी चांगली आहे पण, आव्हानात्मक आहे. ही भूमिका करताना मला खूप आनंद झाला आहे. महिलांनी रिक्षा चालवायची पद्धत आता आपल्याकडे विकसीत केली पाहिजे. तसेच महिलांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे, असे मत योगिता चव्हाणने व्यक्त केले.’

सौरभ चौघुले याबाबत बोलताना म्हणाला की, “आयुष्यात एखादी अशी घटना घडते जी तुमचं संपूर्ण आयुष्यं बदलून टाकते. ज्यादिवशी मी या मालिकेतील भूमिका साकारण्यास होकार दिला त्यावेळी माझं संपूर्ण आयुष्यं बदललं. या मालिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. आता अजून मेहनत करून चाहत्यांच्या अपेक्षा, माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करायची आहे. अशा प्रकारचे पात्र साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण मल्हार सौरभपेक्षा खूप वेगळा आहे, पण मी १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण मल्हारने सौरभला खूप काही दिले आहे, त्यामुळे माझं खूप काही देण लागतं या पात्राला.”

हेही वाचलंत का? 

Back to top button