‘ओटीटी’ची मोहिनी  | पुढारी

‘ओटीटी’ची मोहिनी 

प्रथमेश हळंदे

निव्वळ मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायचा म्हणून थिएटर्समध्ये गर्दी करणार्‍या हौशी प्रेक्षकांच्या मनातला चोखंदळ रसिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी लॉकडाऊनमध्ये जागा केला आहे…

दर शुक्रवारी थिएटरबाहेर रांगा लावायच्या… नुकत्याच रीलिज झालेल्या चित्रपटाची तिकिटं काढायची… ‘आम्ही बाल्कनीवाले’ असा तोरा मिरवत ‘स्टॉल’मधल्या प्रेक्षकांची खिल्ली उडवायची… सोबत नातेवाईक किंवा दोस्त मंडळी असतील; तर पूर्ण रांगच आपल्या ताब्यात घ्यायची. एखादी ‘प्रिय व्यक्‍ती’ असेल, तर कॉर्नर सीटसाठी प्रयत्न करायचा. अशा एक ना अनेक स्वप्नरंजनांत रमणार्‍या आणि ती सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणार्‍या भारतीय प्रेक्षकांवर सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी मोहिनी घातलीय. प्रत्येक वीकेंडला सिनेमागृहांकडे वळणारे चित्रपट रसिक सध्या घरातूनच जगभरातील उत्तमोत्तम चित्रकृतींचा आस्वाद घेत आहेत. टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर्स दणाणून सोडणारं हे पब्लिक घरात कैद करण्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सना कसं यश आलं?

2016 मध्ये ‘जिओ’ने आपल्या स्वस्तात मस्त टेलिकॉम प्लॅन्सच्या जोरावर खर्‍या अर्थाने देशात डिजिटल क्रांती घडवून आणली. महिनाभर 1 जीबी डेटा पुरवून पुरवून वापरणार्‍या भारतीयांना त्याहून जास्त डेटा एका दिवसात खर्च करायची सोय ‘जिओ’ने दिली; पण हा खर्च करायचा कशावर? या विवंचनेत पडलेल्या नेटकर्‍यांच्या मदतीला यू ट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्ससारख्या व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिसेस धावून आल्या. हायस्पीड इंटरनेटच्या जोरावर कोणत्याही वेळी कोणताही चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध होऊ लागला.

अल्पावधीतच, टीव्हीला क्‍वचितच दिसणार्‍या; पण यू ट्यूबवर सहजासहजी मिळणार्‍या कल्ट क्लासिक फिल्म्सचा फोनवर फडशा पाडून जनता कंटाळू लागली. ही संधी हेरून ‘अ‍ॅमेझॉन’, ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘डिज्नी’सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी भारतीय प्रेक्षकांच्या मनोरंजनाची कक्षा वाढवायची जबाबदारी खांद्यावर घेतली.

बहुतांश भारतीय प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे खेचण्याचं निर्विवाद श्रेय 2018 मध्ये रीलिज झालेल्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित ‘सॅक्रेड गेम्स’ या वेबसीरिजला जातं. ‘नेटफ्लिक्स’च्या या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, पंकज त्रिपाठी इत्यादी कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. यात ‘रेस 2’नंतर फॉर्म हरवत गेलेल्या सैफचा अपवाद वगळता इतर सर्वच कलाकार त्यावेळी उल्लेखनीय कामगिरी करत होते. सेन्सॉरचं कसलंही बंधन नसलेली ही सीरिज रीलिज झाली आणि भारतीय प्रेक्षकांच्या, विशेषतः तरुणाईच्या, मनोरंजनाच्या व्याख्याच बदलून गेल्या. हिंसाचार, रक्‍तपात, शिवीगाळ, लैंगिकता तसेच समाजात टॅबू मानल्या जाणार्‍या अनेक गोष्टींचं उघडपणे समर्थन आणि प्रदर्शन करणारी ही सीरिज लोकांना प्रचंड भावली.

‘फ्रेंडस्’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘द बिग बँग थिअरी’सारख्या लोकप्रिय वेबसीरिज आणि ‘सिटकॉम्स’ ओटीटीवर भारतात आधीपासूनच स्ट्रीम होत असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म्स भारतीयांसाठी नवीन नव्हते; पण ‘सॅक्रेड गेम्स’ने प्रेक्षकांच्या अपेक्षांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्म्सचीही पोच वाढवली. आपल्याकडेही विदेशी वेबसीरिजेससारख्या कलाकृती बनू शकतात, त्यांना लाभलेला ‘देसी टच’ आपलं मनोरंजन करू शकतो, याची जाणीव प्रेक्षकांना झाली. थ्रिलर जॉनरच्या चित्रपटांपेक्षा जास्त थ्रिलिंग अनुभव या वेबसीरिज पाहताना मिळत असल्याचं निदर्शनास येत होतं. हे चित्र पाहता क्राईम, स्लॅशर आणि हॉरर जॉनरशी सांगड घालणार्‍या उत्कंठावर्धक वेबसीरिजेसची निर्मिती झपाट्याने होऊ लागली. एखाद्या चित्रपटातील अथवा सीरिजमधील लोकप्रिय पात्रावर वेगळी सीरिज बनावी, अशीही इच्छा प्रेक्षकांकडून व्यक्‍त केली जाऊ लागली. उदाहरणार्थ, ‘मार्व्हल स्टुडिओ’ची ‘लोकी’ ही सीरिज! त्यामुळे सध्या लवकरच या यादीत ‘स्पिन-ऑफ’ सीरिजेसचाही समावेश होऊ शकतो.

थिएटर्समध्ये मुख्यत्वेकरून दाखवल्या जाणार्‍या मेन्स्ट्रीम सिनेमांच्या तुलनेत या वेबसीरिजेसचा आशय बराच वेगळा होता. यातील बहुतांश वेबसीरिज देशातील राजकीय व सामाजिक अस्थिरतेचं चित्रण दर्शवणार्‍या होत्या. कुठलीही सेन्सॉरशिप नसल्याने आणीबाणीसारख्या अनेक वादग्रस्त घडामोडींना वेबसीरिजेसच्या माध्यमातून पुन्हा नव्याने मांडलं जाऊ लागलं. चित्रपटात दाखवतात तशी हॅप्पी एंडिंग व्हायलाच हवी, असा इथे अट्टहास मुळीच नव्हता. इथला बहुतांश आशय वारंवार चर्चिल्या गेलेल्या सत्य घटनांवर आधारित असला, तरी त्या चित्रकृतीतील एंगेजिंग फॅक्टर कमाल होता. करण जोहर, सूरज बडजात्याच्या सिनेमांमधून दिसणारं लोकमान्य नीतिमूल्ये जपणारं सुखवस्तू कुटुंब हाच फक्‍त भारतीय मनोरंजनविश्‍वाचा चेहरा नसून, इथं ‘सॅक्रेड गेम्स’मधली गोपाळमठ वस्ती आहे, ‘मिर्झापूर’सारखी ‘बाहुबली’ शहरं आहेत, जाती-धर्माच्या घाणेरड्या राजकारणावरून भारताचं ‘पाताल लोक’ बनवणारे ‘असुर’ही इथेच आहेत, हे प्रखर सत्य या वेब कंटेंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

मार्च 2020 च्या आसपास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद झाली. या संधीचा फायदा ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी घेतला नसता तर नवलच! जनसामान्यांना परवडतील अशा रेटमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपलं सबस्क्रिप्शन देऊ लागले. गेल्या दीड वर्षात बहुतांश प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरलेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससमोर त्यांची ग्राहकसंख्या वाढवण्याचे आणि टिकवण्याचे आव्हान होते. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात झपाट्याने नवे-जुने चित्रपट आणि वेबसीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर रीलिज होत राहिले. लॉकडाऊनमुळे नव्या-जुन्या प्रोजेक्टस्चं चित्रीकरण स्थगित करण्यात आलं. अशातच निव्वळ कलाकार आणि उपकथानकांचा अपवाद वगळता काही गाजलेल्या वेबसीरिजेससारखीच मूळ कथानकं असलेल्या काही वेबसीरिजही मध्यंतरी रीलिज झाल्या. एखाद्या प्रतिष्ठित घराण्याचा सत्तासंघर्ष, त्याचा स्थानिक जनतेवर पडणारा प्रभाव, कायम वादग्रस्त विधानं करणारं एक पात्र, ङॠइढ+ समूहाचं प्रतिनिधित्व करणारं एक पात्र, शिवीगाळ, सेक्स सीन्स टाकले की झाली भारतीय वेबसीरिज तयार, असं चित्र निर्माण होऊ लागलं होतं.

त्यातच नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, डिज्नीसारख्या ग्लोबल मार्केट गाजवणार्‍या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला टक्‍कर देण्यासाठी झी, सोनी, वूट यांनीही आपल्या स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवा कंटेंट द्यायला सुरुवात केली. ‘ग्रहण’, ‘असुर’, ‘गुल्लक’, ‘वेलकम होम’सारखे सन्माननीय अपवाद वगळता या प्लॅटफॉर्म्सवरही ‘ओरिजनल्स’च्या नावाखाली शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रकार सुरू झाल्याचं चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात आलं. अशावेळी नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी फॉरेन कंटेंट भारतीयांसाठी खुला केला. बहुचर्चित आणि लोकप्रिय वेबसीरिजेसचं भारतीय भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. भारतीय कंटेंटमधला तोचतोचपणा बघून कंटाळलेल्या प्रेक्षकांनी या विदेशी सीरिज डोक्यावर घेतल्या. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘ला कासा दे पापेल’ ही स्पॅनिश वेबसीरिज जी पुढे जगभरात ‘मनी हाईस्ट’ म्हणून नावाजली गेली.

भारतीय प्रेक्षक जेव्हा या विदेशी सीरिज आणि फिल्म्स बघण्यात गुंग होता तेव्हा या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी आपला मोर्चा भारतातील रिजनल चित्रपटसृष्टीकडे वळवला. मोठमोठ्या बॅनरच्या आणि चित्रकर्मींच्या दर्जेदार फिल्म्सचे प्रसारण हक्‍क त्यांनी आपल्याकडे घेतले. नेटफ्लिक्स अशा कंटेंटसाठी भरपूर पैसा ओतत असली तरी यात खरी बाजी मारली ती अ‍ॅमेझॉन प्राईमने! मराठी, तेलुगू, तमिळ, कन्‍नड, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि विशेषतः मल्याळम भाषेतील बहुरंगी फिल्मी खजिना प्राईमवर आजही उपलब्ध आहे. भारतीय सिनेमा म्हणजे ‘बॉलीवूड’ असं जे फसवं चित्र सध्या जगासमोर आहे, त्याला सुरुंग लावण्याचं श्रेय ओटीटी प्लॅटफॉर्म्सला जातं. विदेशी कंटेंट बघून भारावून गेलेल्या भारतीयांसमोर लगेच हा ‘अस्सल मातीतला’ कंटेंट खुला करण्यात आला आणि भारतीय सिनेसृष्टीची खरी प्रतिष्ठा फक्‍त ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्याच हातात आहे, ही जाणीव सिनेरसिकांना झाली. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरचा भारतीयांवरचा विश्‍वास द‍ृढ करण्यात हा ‘रिजनल कंटेंट’वाला मार्केटिंग फंडा रामबाण ठरला.

कोरोनामुळे प्रदीर्घकाळ थिएटर्सवर लागू असलेले निर्बंध आणि प्रेक्षकांनी ओटीटीवर ठेवलेला विश्‍वास पाहता अनेक मोठ्या स्टार्सनीही आपले बहुप्रतीक्षित सिनेमे ओटीटीवरच रीलिज करायचं ठरवलं. यात अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’, सलमानचा ‘राधे’ असे बरेच चित्रपट होते. हे चित्रपट खास मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी बनवले गेले असल्याने त्यांचे व्हिज्युअल्सही तितकेच भव्य-दिव्य होते. परिणामी, या कमर्शियल सिनेमांना आर्थिकद‍ृष्ट्या फारसं नुकसान सोसावं लागलं नसलं, तरीही प्रेक्षकांच्या नाराजीला मात्र सामोरं जावं लागलं. हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भारतीय प्रेक्षकांनी ओटीटीवरील रिजनल कंटेंटची चव चाखली असल्याने साहजिकच बॉलीवूडकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या; पण ‘लक्ष्मी’ आणि ‘राधे’चा करिष्मा प्रेक्षकांना आपल्याकडे खेचू न शकल्याने इतर बड्या कलाकारांनीही आता धसका घेतला असून, चित्रपट शक्यतो थिएटर्समध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे; पण त्याचबरोबरीने ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं वाढतं प्रस्थ लक्षात घेता या कलाकारांनी वेबसीरिजेसच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा विडा उचलला आहे. अमोल पालेकर, सुश्मिता सेन, रविना टंडन यांच्यापाठोपाठ अजय देवगण, शाहरूख खान, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा इत्यादींनी आपापल्या प्रोडक्शन हाऊसकडून नव्या सीरिजेसची घोषणा केली आहे.

मेनस्ट्रीम सिनेमामध्ये दुय्यम भूमिका साकारणार्‍या कलाकारांना ओटीटीवरील कंटेंटमधून खर्‍या अर्थाने न्याय मिळतोय. भाषा, संस्कृती आणि लोकजीवनातलं वैविध्य ओटीटीवरील रिजनल सिनेमांमुळे कळतंय, आपल्याला हवा तेव्हा, हवा तिथे, हवा त्या प्रकारचा कंटेंट पाहता येतोय, इथे नेपोटिझमऐवजी फक्‍त गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. कसलीही सेन्सॉरशिप नसल्याने अस्सल कंटेंट आपल्यासमोर येतोय, अशी मन:स्थिती ओटीटीवर डोळे झाकून विश्‍वास ठेवणार्‍या भारतीय प्रेक्षकांची झाली आहे. हे मत अर्थातच थिएटर्समध्ये गाजावाजा करत रीलिज होणार्‍या मेनस्ट्रीम आणि आर्टहाऊस फिल्म्सच्या विरोधातलं असलं, तरी आपला प्लॅटफॉर्म हा थिएटरमध्ये न चालणार्‍या फिल्म्सचं ‘डंपिंग ग्राऊंड’ बनू नये याची खबरदारी प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मने घेणं गरजेचं आहे.

सेलिब्रेशन हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक गुणधर्म आहे. मृत्यूसारख्या दुःखद प्रसंगाचाही सोहळा साजरा करणारे भारतीय थिएटर्समध्ये सिनेमा बघण्याचा उत्साह कसा थोपवू शकतील? जेव्हा कोरोनाचं संकट पूर्णपणे टळेल आणि पूर्ण क्षमतेने थिएटर्स चालू होतील, तेव्हा तिथे आधीसारखीच गर्दी करायला भारतीय प्रेक्षक मागे-पुढे बघणार नाहीत; पण यावेळी कोणता सिनेमा पाहायचा आणि कोणता नाही, याचा चॉईस त्यांच्याकडेच असेल, हे नक्‍की! निव्वळ मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायचा म्हणून थिएटर्समध्ये गर्दी करणार्‍या हौशी प्रेक्षकांच्या मनातला चोखंदळ रसिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी या लॉकडाऊनमध्ये जागा केला आहे. त्यामुळे निव्वळ प्रमुख कलाकारांच्या ‘मास अपील’वर अवलंबून राहणार्‍या फिल्ममेकर्सनी आपल्या चित्रकृतीचा ‘क्लास’ही कसा वाढेल, यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

Back to top button