

मंदार जोशी
आजचा चित्रपट डिजिटल सिनेमा म्हणून ओळखला जातो. पूर्वी एखाद्या ठिकाणी चित्रपट चित्रित करायचा झाला, तर केवढा 'ताम झाम' चाले. सारे गाव गोळा होई. परंतु, आता चित्रीकरण होऊन क्रू दुसरीकडे गेला, तरी कोणाला पत्ता लागत नाही. हे सगळं घडलं ते तंत्रातील बदलांमुळे.
काळाबरोबर जो बदलतो, तोच स्पर्धेत टिकून राहतो. म्हणूनच 64 कलांमध्ये चित्रपट ही कला तुलनेनं नवीन असली, तरी इतर कलांच्या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवून आहे. किंबहुना, काळाच्या प्रवाहाबरोबर ही कला सतत स्वतःला नदीप्रमाणे प्रवाही ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणूनच चित्रपट माध्यमात सातत्यानं नवीन बदल घडत आहेत आणि प्रेक्षकही त्यांचा स्वीकार करीत आहे. लेखन, दिग्दर्शन, वितरण, छायाचित्रण, प्रसिद्धी अशा सर्व आघाड्यांवर हे बदल झाले आहेत, हे विशेष. आजचा चित्रपट डिजिटल सिनेमा म्हणून ओळखला जातो. पूर्वी एखाद्या ठिकाणी चित्रपट चित्रित करायचा झाला, तर केवढा 'ताम झाम' चाले. सारे गाव गोळा होई. परंतु, आता चित्रीकरण होऊन क्रू दुसरीकडे गेला, तरी कोणाला पत्ता लागत नाही. हे सगळं घडलं ते तंत्रातील बदलांमुळे.
पूर्वीच्या काळात लेखक मंडळी आपली कथा-पटकथा-संवाद कागदावर लिहीत; पण तो जमाना आता उलटून गेलाय. आता पटकथालेखनाची वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आली आहेत. त्यातच तुम्हाला लिहावं लागतं. कॅमेरा हा तर दिग्दर्शकाचा डोळा असतो. त्यातला बदल तर क्रांतिकारीच म्हणावा लागेल. पूर्वीच्या काळात मोठमोठाले कॅमेरे सिनेमॅटोग्राफर्सना हाताळावे लागत. परंतु, आताचे चित्रपट मोबाईल कॅमेर्यामधूनही चित्रित केले जात आहेत. त्यामुळे नवीन अँगल्स प्रेक्षकांना पाहायला मिळतात. थोडक्यात, आपला हिंदी चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. 'राम और श्याम', 'अंगूर', 'सीता और गीता', 'देशप्रेमी', 'आखरी रास्ता' हे काही 'ग्रेट' चित्रपट नव्हते. तरीदेखील या चित्रपटांना मोठं यश मिळालं. अर्थात, त्याला कारणीभूत ठरले ते त्यातल्या कलाकारांचे 'डबल रोल्स.' हा प्रकारही एखाद्या चित्रपटाचा 'यूएसपी' ठरू शकतो. मात्र, हेच चित्रपट आज पाहताना त्यातल्या तांत्रिक उणिवांची आपल्याला कल्पना येते आणि आताचा चित्रपट तंत्राच्या आघाडीवर किती पुढं गेलाय, याची खात्रीही पटते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात तंत्राला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. 'कॅमेरा मास्किंग'चं तंत्र समजल्यानंतर अशाप्रकारच्या चित्रपटांची आपल्याकडे निर्मिती होऊ लागली; परंतु त्या तंत्रातही अनेक उणिवा असल्यामुळं, 'डबल रोल्स'वाले चित्रपट चित्रित करताना निर्माता-दिग्दर्शकांच्या नाकी नऊ येई. कलाकाराची दुहेरी भूमिका असली, तरी दोन्ही व्यक्तिरेखांना शक्यतो समोरासमोर न आणण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असे. मात्र, काही अपरिहार्य परिस्थितीत या दोघांना एकमेकांसमोर आणायची वेळ येई, तेव्हा नायकासमोर 'डमी' उभा करून फक्त त्याची पाठ दाखविली जायची. तसेच काही वेळा एकच प्रसंग दोन वेळा चित्रित केला जायचा. या दोन्ही प्रसंगांमध्ये 'डबल रोल' साकारणार्या कलाकाराला भाग घ्यावा लागायचा. संकलनाच्या टेबलावर मग हे दोन्ही प्रसंग एकत्र केले जायचे. जुन्या काळातले चित्रपट बारकाईनं पाहिल्यास या जोडकामाचं फलित म्हणून एक बारीक रेषा पडद्यावर पाहायला मिळते. आता अॅनिमेशन आणि डिजिटल तंत्राच्या सहाय्यानं ही रेषासुद्धा काढून टाकणं शक्य झालं आहे.
'अॅनिमेशन', 'स्पेशल इफेक्टस्' हे तंत्र उदयास येण्यापूर्वी 'ट्रिक फोटोग्राफी'चा सगळीकडे दबदबा होता. अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक चित्रपट या तंत्राच्या सहाय्यानं चित्रित करण्यात आले. बाबुराव मिस्त्री यांनी हे तंत्र लोकप्रिय केलं. एका हातात पर्वत घेऊन जाणार्या हनुमानाला पडद्यावर पाहताना प्रेक्षक दीपून जात. तंत्रात जसजसे बदल होत गेले, तसतशी प्रेक्षकांची आवड पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न होऊ लागले. मोटार पाठलागाची दृश्यं, बॉम्बद्वारे मोटार आणि इमारती उडविणं, नायकानं उंचावरून मारलेल्या चित्रविचित्र उड्या, वाघ-सिंह यासारख्या जंगली प्राण्यांबरोबरची दृश्यं चित्रित करताना दिग्दर्शक तसेच तंत्रज्ञ मंडळी आपलं कौशल्य पणास लावू लागली. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा या दोन दिग्दर्शकांनी आपल्या अमिताभपटांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नव्हते. मेहरांच्या 'जादूगर'मधील अमिताभनं दाखविलेले जादूचे प्रयोग अगदीच सुमार होते. 'गंगा-जमुना-सरस्वती'च्या 'क्लायमॅक्स'मध्ये अमिताभच्या खांद्यावरील मगर पाहिल्यानंतर चित्रपटगृहांमध्ये हास्याचे फवारे फुटले होते. कारण, मनमोहन देसाई यांनी खर्या मगरीऐवजी रबराची मगर वापरली होती. 'डॉन'मध्ये अभिनेते प्राण यांच्यावर दोन मुलांसमवेत एका इमारतीमधून दुसर्या इमारतीमध्ये दोरावरून जाण्याचा प्रसंग चांगलाच लोकप्रिय ठरला होता. हा प्रसंग 'ट्रॅव्हलिंग मॅटस्' या तंत्रानं चित्रित करण्यात आला होता.
1990 नंतर 'स्पेशल इफेक्टस्' तंत्राचा हिंदी चित्रपटात मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. 'गुलाम' चित्रपटामध्ये आमीरनं चालत्या लोकलसमोरून मारलेली उडी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविणारी ठरली. हे दृश्य एवढं वास्तवदर्शी झालं होतं की, हा चित्रपट पाहिलेल्या आमीरच्या अनेक चाहत्यांनी त्याला अशी जीवघेणी दृश्यं साकारू नकोस, असा सल्ला दिला होता. हे दृश्य 'ब्ल्यू मॅट' तंत्राच्या सहाय्यानं चित्रित करण्यात आलं होतं. 'ब्ल्यू स्क्रीन'च्या पार्श्वभूमीवर आमीरची धावण्याची तसेच त्यानं मारलेली उडी चित्रित करण्यात आली. तसेच दुसरीकडे धावत्या लोकलचं छायाचित्रण करण्यात आलं. पुढचं उरलेलं काम संगणकानं केलं. निळा किंवा हिरवा रंग इतर रंगांपासून वेगळा करणं सोपं असतं. म्हणून या तंत्रात निळा पडदा निवडण्यात येतो. 'दिल चाहता है'मध्ये अक्षय खन्नानं फोडलेले फुगे हे संगणकनिर्मित होते. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एक पतंग उडविण्याचं दृश्य आहे. वार्याच्या वेगामुळं दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना हा प्रसंग व्यवस्थित चित्रित करता येईना. तेव्हा भन्साळींनी तंत्राचं सहाय्य घेतलं. हा मूळ प्रसंग अवघ्या चार पतंगांद्वारे चित्रित केला. संगणकाच्या सहाय्यानं मग चाराचे चारशे पतंग झाले.
हिंदी चित्रपटांच्या 'बजेट'मधली सर्वाधिक रक्कम ही कलाकारांवर खर्च केली जाते. अॅनिमेशन तसेच इतर तंत्राला आपण अजूनही महत्त्व दिलेलं नाही. मात्र, कमल हसनसारख्या कलाकाराला या तंत्राचं महत्त्व ठाऊक असतं. 'अप्पू राजा', 'हे राम' तसेच 'अभय'मध्ये त्यानं तंत्राचा खूप चांगला वापर केला होता. 'अभय'च्या 'बजेट'मधील 50 टक्के रक्कम फक्त 'स्पेशल इफेक्टस्'साठी राखीव ठेवण्यात आली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी खास ऑस्ट्रेलियाहून 'मोशन कंट्रोल्ड कॅमेरा' मागविण्यात आला होता. 'टोटल रिकॉल', 'क्लिफहँगर', 'अॅनाकोंडा'फेम जॉर्ज मर्कर्ट यांनी 'अभय'मधील 25 मिनिटांचं 'अॅनिमेशन' केलं होतं.
'डिजिटली' चित्रित केलेला पहिला चित्रपट म्हणून 'टायटॅनिक'चं नाव घेता येईल. 1998 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की, गेल्या दोन दशकांपासून चित्रपट माध्यम सातत्यानं बदलतंय. या चित्रपटातील पाण्यापासून ते त्यातील जहाजावरील व्यक्तींनी समुद्रात मारलेल्या उड्या, या तंत्राच्या करामती होत्या. या चित्रपटातील खरी गोष्ट म्हणजे, कलाकारांचे 'क्लोज-अप्स.' स्कॉट रॉस यांच्या तंत्राच्या जोरावर हा चित्रपट जगभर गाजला. या तंत्रासाठी रॉस यांनी 4 कोटी डॉलर खर्च केले होते. आपला चित्रपट वेगवेगळ्या आघाड्यांवर बदलत राहिला आहे. त्यामधील सर्वाधिक महत्त्वाचा बदल झाला तो प्रदर्शनामध्ये. आता सगळे चित्रपट 'यूएफओ' या यंत्रणेद्वारे जगभर दाखविले जातात. परंतु, पूर्वीच्या काळात प्रिंटद्वारे चित्रपटांचं प्रदर्शन होईल. पूर्वी एका चित्रपटाची प्रिंट काढण्यासाठी सुमारे 60 हजार रुपये खर्च यायचा. नवीन चित्रपटांच्या हजारोंच्या घरात प्रिंटस् निघत असल्यामुळं प्रिंट काढण्यासाठी वितरकाला मोठी गुंतवणूक करावी लागते. चित्रपट अपयशी ठरला, तर मग वितरकाला फार मोठा फटका बसतो. त्यामुळेच वितरकावरील खर्चाचं दडपण दूर करण्याच्या दृष्टीनं हल्ली 'डिजिटल सिनेमा'चं नवीन तंत्र बाजारात आलं. या तंत्रानं प्रिंटला हद्दपार केले. उपग्रहाच्या सहाय्यानं चित्रपटगृहामध्ये संपूर्ण चित्रपट काही सेकंदांमध्ये 'डाऊनलोड' केला जातो.
चित्रपट हे माध्यम कलेचं असलं, तरी विज्ञानाशी त्याचं अगदी घनिष्ठ नातं आहे. वीज कडाडल्यानंतर आधी तिचा लकलकाट दिसतो आणि नंतर गडगडणं ऐकू येतं. चित्रपट पाहताना प्रेक्षकांचं लक्ष प्रथम दृश्याकडे जातं आणि नंतर आवाज कानी पडतो. म्हणजेच दृश्य परिणामाच्या तुलनेत आवाज हा दुय्यम स्थानी आहे. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गीत-संगीत, कलाकारांचे संवाद, पार्श्वसंगीत या तीन आघाड्यांवर हल्लीचा नवीन चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात महत्त्वाचा 'रोल' निभावत आहे. या तीन आघाड्यांना एकत्र करून त्याचं 'साऊंड डिझाईन' असं नवीन नामकरण आता झालं आहे. या त्रिकुटाला जोड मिळालीय ती 'सायलेन्स'ची. बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या नापसंतीस उतरतात, ते त्यामधील कलाकारांच्या 'नॉनस्टॉप' बडबडीमुळे. अशा परिस्थितीत चित्रपटात 'सायलेन्स' खूप आवश्यक असतो.
हिंदी चित्रपटसृष्टीनं आवाज या माध्यमातही गेल्या काही दशकांमध्ये खूप मोठा प्रवास केलाय. प्रेक्षकांना आवाजाचं खरं महत्त्व कळलं ते पडद्यावरील पात्रं बोलू लागल्यानंतर. कोलकात्याच्या 'मदन थिएटर्स'नं हिंदी चित्रपट बोलका करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. या कंपनीनं स्वातंत्र्यपूर्व काळात देशभरातील अनेक चित्रपटांमध्ये 'साऊंड सिस्टीम्स' बसवल्या. 'आलमआरा' या पहिल्या बोलपटाचे निर्माते-दिग्दर्शक अर्देशर इराणी यांनी आवाजाच्या क्षेत्रात खूप काम केलं. हॉलीवूडमध्ये त्या काळात 'साऊंड'मध्ये विलफोर्ड डेमिंग यांचं नाव खूप मोठं होतं. इराणी यांनी डेमिंग यांच्याकडून 'साऊंड रेकॉर्डिंग'चं तंत्र शिकून घेतलं. त्यानंतरच्या चार दशकांमध्ये हिंदी चित्रपटानं आवाजामध्ये फार काही लक्षणीय झेप घेतली नाही. मात्र, 1970 च्या दशकापासून कलात्मक चित्रपटांचं वारं वाहू लागल्यानंतर आवाजाला पुन्हा जाग आली.
'शोले' चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी 'साऊंड डिझाईन' क्षेत्रात क्रांतिकारी बदल केले. हा चित्रपट जेवढा दृश्यात्मक परिपूर्ण आहे, तेवढाच आवाजाबाबतही. किंबहुना, 'साऊंड डिझाईन'मध्ये हा चित्रपट 'के स्टडी' म्हणूनही ओळखायला जायला हवा. निव्वळ आवाजाचा विचार करून दिग्दर्शक सिप्पी यांनी या चित्रपटात काही दृश्यांची रचना केली होती. अमिताभनं वाजविलेल्या 'माऊथ ऑर्गन'मधून त्याचं एकटेपण आणि प्रेमासाठी आतुर असणं प्रभावीपणे व्यक्त झालंय. हेमामालिनीची अखंड बडबड आणि जया भादुरीच्या 'सायलेन्स'मधून दिग्दर्शकानं त्यांच्या व्यक्तिरेखा छान उभारल्या आहेत.
यश चोप्रांनी 'दिवार' चित्रपटाच्या 'क्लायमॅक्स'मध्ये आवाजाला मोठं प्राधान्य दिलं होतं. चित्रपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यात पाठलाग सुरू असताना अमिताभच्या खिशातून '786'चा लोखंडी बिल्ला पडतो. त्यावेळी वाजविलं गेलेलं पार्श्वसंगीत अमिताभच्या व्यक्तिरेखेचं पुढं काय होणार, याची प्रेक्षकाला कल्पना देऊन जातं. भट्ट, सुभाष घई यांच्या चित्रपटांतही 'साऊंड'ला खूप महत्त्व दिलं जातं. श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, गुलजार, प्रकाश झा, केतन मेहता आदी दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांमध्ये आवाजाचा खूप छान उपयोग करून घेतला.
चित्रपटाच्या आवाजातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'बॅकग्राऊंड स्कोअर.' सर्वसाधारणपणे चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक हा त्या चित्रपटाला 'बॅकग्राऊंड स्कोअर' देत नाही. 'अनोखी अदा' या चित्रपटाला रोशन यांनी संगीत दिलं होतं, तर त्याचं पार्श्वसंगीत सलील चौधरी यांचं होतं. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं, तर 'साथिया'ची गाणी विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केली होती, तर त्याचं पार्श्वसंगीत संदीप चौटा यांचं होतं. संगीतकार हा चाली बांधण्यात कमालीचा व्यग्र असल्यानं त्याला चित्रपटाला पार्श्वसंगीत देणं शक्य व्हायचं नाही. मात्र, अलीकडच्या काळात संगीत दिग्दर्शक अन्नू मलिकनं चित्रपटांना संगीत देण्याबरोबरच पार्श्वसंगीत देण्याचाही प्रकार सुरू केला. मन्सूर खान दिग्दर्शित 'अकेले हम अकेले तुम' चित्रपटासाठी त्यानं ही दोन्ही कामं केली होती. 'जी व्यक्ती चित्रपटाला संगीत देण्याबरोबरच त्याला पार्श्वसंगीतही देते, तिलाच परिपूर्ण संगीतकार मानलं गेलं पाहिजे,' असं मत मन्सूरनं तेव्हा व्यक्त केलं होतं.
'डबिंग' आणि 'सिंक साऊंड' हे दोन शब्द 'साऊंड डिझाईन' प्रकारातील परवलीचे शब्द आहेत. एखादा चित्रपट चित्रित झाल्यानंतर मग कलाकारांचे संवाद 'डब' केले जातात. या 'डबिंग'मध्ये गोंधळ झाल्यास कलाकारांच्या ओठांच्या हालचाली संवादाशी मेळ खात नाहीत. हा प्रकार खूप किचकट आणि वेळखाऊ असतो. त्यावर मात करण्यासाठी 'सिंक साऊंड' तंत्रज्ञानाचा शोध लागला. दिग्दर्शक महेश मथाई यांनी प्रथम 'भोपाळ एक्स्प्रेस' चित्रपट या तंत्रानं चित्रित केला होता. या तंत्रज्ञानात चित्रीकरणाच्या वेळीच कलाकारांचे संवाद ध्वनिमुद्रित केले जातात. त्यामुळे कलाकारांना आपल्या अभिनयाबरोबरच आवाजाकडेही बरंच लक्ष द्यावं लागतं.
आशुतोष गोवारीकर यांचं दिग्दर्शन असलेला 'लगान' चित्रपट याच तंत्रानं चित्रित करण्यात आला होता. नकुल कामते त्याचे 'साऊंड डिझायनर' होते. क्रिकेट सामन्याच्या चित्रीकरणासाठी कामते यांनी क्रिकेट पीचच्या खाली अनेक 'माईक' पुरले होते. गर्दीच्या दृश्यांचं चित्रीकरण करताना कामते यांना खूप अडचणी आल्या होत्या. कामते यांच्याखेरीज अनुज माथूर हेसुद्धा सध्याचे आघाडीचे 'साऊंड डिझायनर' आहेत. 'चांदनी', 'दिल तो पागल है', 'कल हो ना हो', 'बंटी और बबली' आदी यशस्वी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. 'बंटी और बबली' चित्रपटाचं कानपूर रेल्वेस्थानकावर दहा हजार लोकांच्या गर्दीत चित्रीकरण सुरू असताना माथूर यांचं कौशल्य पणास लागलं होतं. अशाप्रकारे आपल्याकडील निर्माते-दिग्दर्शक आवाजाबाबत आता जागरूक झाले आहेत. मात्र, आपण अजूनही हॉलीवूडच्या तुलनेत पिछाडीवरच आहोत. तेथील निर्माते 'साऊंड डिझाईन'साठी एकूण 'बजेट'च्या 5 ते 7 टक्के तरतूद करतात. हिंदी चित्रपटसृष्टीत हे प्रमाण अवघे 1 ते 2 टक्के आहे. तिकडे एका चित्रपटाचा आवाज चांगला लागण्यासाठी किमान 70 ते 80 लोक धडपडत असतात.
आपल्याकडे हा आकडा 20 जणांच्या वर जात नाही. मात्र, हे चित्रही काही वर्षांमध्ये बदलेल, असं वाटतं. अॅक्शन चित्रपटही आता तंत्राच्या आघाडीवर खूपच उजवा आहे. मुख्यतः आपल्याकडे आता 'फाईव्ह-जी' तंत्रज्ञान लवकरच येतेय. त्यामध्ये इंटरनेटचा वेग हा दहा जीबीपीएसपर्यंत असेल. म्हणजेच आता जी कामं व्हायला काही मिनिटं किंवा तास लागत आहेत ती अवघ्या काही सेकंदांमध्ये होणार आहेत. त्यामुळे पुढील दशकामधला आपल्या सिनेमानं तंत्राच्या आघाडीवर आणखी मोठी उडी घेतली असेल…