‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस’ मेमध्ये येणार
पुढारी ऑनलाईन
'स्पायडर मॅन : नो वे होम'नंतर आता मार्व्हल स्टुडिओजच्या पुढच्या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. खरे तर 'स्पायडर मॅन : नो वे होम'च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्येच हा संपूर्ण ट्रेलर दाखवण्यात आला होता. (पोस्ट क्रेडिट सीन म्हणजे चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीनंतरचा सीन. अशा सीन्सची सवयच 'मार्व्हल'ने प्रेक्षकांना लावली आहे. त्यांच्या चित्रपटांचे पोस्ट क्रेडिट सीन आणि मीड क्रेडिट सीन हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे.)
या ट्रेलरमध्ये दिसते की, डॉक्टर स्ट्रेंजसोबत त्याचेच एक इव्हिल रूपही यात आहे, जे जगासाठी धोकादायक बनले आहे. मल्टिव्हर्स ही संकल्पना यापूर्वी 'लोकी', 'वांडा-व्हिजन' या वेबसीरिज आणि 'स्पायडर मॅन ः नो वे होम'मध्ये दाखवली गेली आहे. अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅच डॉ. स्टीव्हन स्ट्रेंज या मुख्य भूमिकेत आहे. वांडा तथा स्कार्लेट विच म्हणजेच अभिनेत्री एलिझाबेथ ओल्सेनदेखील यात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सॅम रायमी दिग्दर्शित हा चित्रपट 6 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

