

पुढारी ऑनलाईन
लॉर्डस् मैदानावर भारतीय संघाने 25 जून 1983 रोजी क्रिकेट विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर आधारित '83' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारा मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर दाखवण्यात आला. त्यामुळे या टीमचे कौतुक केले जात आहे.
आदिनाथ हा बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. याबद्दल आदिनाथ म्हणाला, मी फार भावुक झालो आहे. जगातील सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा दिसणे हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.
'83' चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकल्यापासून मला माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, नातेवाईकांसह चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत, असेही आदिनाथ म्हणाला.