

87 years old waheeda rehman reacts on ar rahman communal comment
पुढारी ऑनलाईन :
संगीतकार ए. आर. रहमान यांनी बॉलीवूडमधील सांप्रदायिक भेदभावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अनेक नामवंत व्यक्तींनंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनीही या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कामामध्ये चढ-उतार येतच असतात, यात काही विशेष नाही.
संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘कम्युनल बायसनेस’वर केलेल्या वक्तव्यानंतर ते वादात सापडले आहेत. रहमान यांनी अलीकडेच सांगितले होते की, गेल्या काही वर्षांपासून त्यांना काम मिळत नाहीये. यामागचे कारण त्यांनी इंडस्ट्रीमधील ‘सांप्रदायिक भेदभाव’ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यांच्या वक्तव्याला विरोध केला, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला. आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.
वहीदा रहमान काय म्हणाल्या?
‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान वहीदा रहमान यांना ए. आर. रहमान यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “हो, मी याबद्दल वाचले आहे. पण मला याच्या खोलात जायचे नाही. जेव्हा सगळं नीट चाललेलं असतं, तेव्हा अशा गोष्टींवर जास्त लक्ष देण्याची गरज वाटत नाही. प्रत्येक देशात अशा लहानसहान गोष्टी घडत असतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “कुणावर विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा? हे खरं आहे की नाही, यात आपण का गुंतून घ्यायचं? किमान माझ्या या वयात तरी मला कोणत्याही वादात पडायचं नाही. शांततेत रहा, हा आपलं देश आहे. फक्त आनंदी रहा. मी एवढंच सांगू शकते.”
वहीदा रहमान यांनी पुढे हेही सांगितले की, कदाचित रहमान यांना अपेक्षेइतकं काम मिळत नसेल, म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. त्या म्हणाल्या, “कामामध्ये चढ-उतार येतच असतात. एका वयानंतर लोक म्हणतात की, एखाद्या नव्या किंवा वेगळ्या व्यक्तीला संधी द्या. या सगळ्या कारणांमुळे काही लोक मागे पडतात. कोणी एकदा खूप मोठ्या उंचीवर पोहोचले म्हणून तेच कायम राहतील आणि त्यांनाच काम मिळेल, असं होत नाही. चढ-उतार हे होतच असतात. यात काही नवीन नाही.”
ए. आर. रहमान नेमकं काय म्हणाले होते?
संगीतकार ए. आर. रहमान यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सध्या बॉलीवूडमध्ये अशा लोकांकडे सत्ता आहे, जे फारसे क्रिएटिव्ह नाहीत. ते म्हणाले होते, “गेल्या ८ वर्षांत कदाचित सत्तांतर झालं आहे आणि जे लोक क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. कदाचित सांप्रदायिक बाबही असू शकते, पण कोणीही माझ्या समोर तसं थेट बोललेलं नाही. मात्र काही कुजबुज ऐकू येते.” रहमान यांच्या याच वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.