एक होती सुरेखा सिक्री ! | पुढारी

एक होती सुरेखा सिक्री !

बाबू मोशाय

तिच्या चेहर्‍यावरच्या रेषा आणि सुरकुत्या, केसांवरचे पांढरे धुके, काटकुळ्या हातातील निर्धार आणि नजरेतले खंबीर भाव…! रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत आपल्या खुणा ठेवून गेलेली सुरेखा सिक्री ही श्रेष्ठ दर्जाची अभिनेत्री होती. झोया अख्तरच्या ‘घोस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील अँथॉलॉजी चित्रपटात तिला शेवटचे पाहिले. तीन वर्षांपूर्वीच ‘बधाई हो’मुळे तिची लोकप्रियता कळसास पोहोचली. कोरोनाच्या काळात इतरांप्रमाणे तीही घरीच बसून होती. त्यात ब्रेनस्ट्रोक झाला. अफवा पसरली की, सुरेखा आर्थिक तंगीत आहे आणि तिला मदत हवी आहे. सुरेखाने या अफवेचे ताबडतोब खंडन केले होते. त्याचवेळी 65 वर्षांच्या पुढील वयाच्या कलाकारांना शूटिंगमध्ये भाग घेता येणार नाही, असे बंधन आले. त्यावेळी सुरेखा म्हणाली, ‘लोग ये न समझें की कोरोना के चलते मैं उनसे भीख माँग रही हूँ। मुझे परोपकार नहीं चाहिए। मुझे काम दो, मैं सन्मानपूर्वक पैसा कमाना चाहती हूँ।’ अंथरूणावर खिळले असताना ती म्हणाली की, ‘माझ्या कुटुंबीयांवर माझे ओझे असावे, असे मला वाटत नाही.’ अशी ही अत्यंत स्वाभिमानी अभिनेत्री!

‘बधाई हो’ या चित्रपटात प्रौढ सुनेलाच पुन्हा दिवस गेल्याचे कळल्यावर दादी सुरेखा म्हणते, ‘यूँ तो बच्चों का काम होता है नाम रौशन करना। तुने तो अपने बच्चों को मौका ही नहीं दिया! मैं तो नकुल को जोक करे थी कि तेरी गोद में बालक देखना चाहूँ। तेरी बहू ने तो सिरियस ले लिया।’ शाम बेनेगल यांच्या ‘मम्मो’ चित्रपटात तिच्या फय्यूझीच्या रोलमध्ये उबदारपणा आणि भावनांचा कल्लोळ होता. ‘हरीभरी’मध्ये कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ स्त्रीची भूमिका तिने अत्यंत समर्थपणे निभावली. ‘मीस्टर अँड मिसेस अय्यर’मध्ये सुरेखाला केवळ दोन सीन्स मिळाले; पण इक्बालच्या पतिनिष्ठ व प्रेमळ पत्नी नजमाचे काम तिने बेहतरीन केले. ‘बालिका वधू’ मालिकेतील सुरेखाची कल्याणी देवी सिंग अविस्मरणीयच. त्याचप्रमाणे ‘गोदान’, ‘महाकुटुंब’, ‘एक था राजा एक थी रानी’ अशा अनेक मालिकांत सुरेखाने आपली छाप सोडली. ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटात ‘पॉलिटिक्स में राईट और राँग नहीं होता. मंझील ही सबकुछ है, रास्ता चाहे कोई भी हो।’ हा संवाद सुरेखा अत्यंत अर्थपूर्णरीत्या म्हणते.

‘तमस’मध्ये दंगलीच्या वातावरणात एका शीख कुटुंबाला आसरा दिला, तर नवर्‍याला चालेल का, असा प्रश्‍न पडणार्‍या मुस्लिम स्त्रीचे काम सुरेखाने केले. ते शीख पती-पत्नी निराश होऊन जाताना, ‘उपरवाली कोठरी में जाओ’ असे म्हणणारी सुरेखाची ‘राजो’ अजूनही आठवते. वयापेक्षा अधिक वयाच्या म्हातार्‍या स्त्रीचे काम करताना, आवाजातील कंप आणि शरीराच्या मंदगती हालचाली ती अचूक अभिनित करत असे.

अनादिअनंत, सईद मिर्झाचा ‘सलीम लंगडे पे मत रो’, प्रकाश झाचा ‘परिणती’, ‘लिटिल बुद्धा’, ‘नसीम’, ‘सरदारी बेगम’, ‘झुबेदा’, ‘रघू रोमिओ’, ‘रेनकोट’ आणि ‘देव डी’, ‘हमको दीवाना कर गये’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘जो बोले सो निहाल’ यासारखे विविधांगी चित्रपट तिने केले. सुरेखाचे हिंदी ऐकत राहावे असे. आवाजाचे प्रोजेक्शन लक्षणीय. डोळे भेदक आणि रुंद जिवणीआड सांगण्यासारखे खूप काही आहे, असेच सतत वाटायचे. भारंभार संवादांपेक्षा तिचा एक कटाक्ष पुरा असायचा. टीव्ही मालिकेमध्ये एपिसोड संपताना इफेक्ट साधावा लागतो. अशा प्रसंगात सुरेखा असली, की ती तो परिणाम जबरदस्त साधायची.

एनएसडीमध्ये प्ले नॅलिसिस, कॉस्च्युम, मेकअप, लाइटिंग, बॅकस्टेज एरिया या सगळ्याचे तंत्र तिने तीन वर्षांत शिकून घेतले. पंधरा वर्षे एनएसडीच्या रेपर्टरीमध्ये सुरेखाने ‘मुख्यमंत्री’, ‘संध्या छाया’, ‘बेगम का तकिया’, ‘थ्री सिस्टर्स’ अशी अनेक नाटके केली. मनोहर सिंग, ओम पुरी, रघुवीर यादव, नसीर, उत्तरा असे एकापेक्षा एक कलाकार तिथे घडत होते. ‘ट्रोजन वूमन’मध्ये सुरेखाने ‘हेलन ऑफ ट्रॉय’चा रोल केला. मुंबईतील नाट्यजगताशी परिचय नसल्यामुळे ती सिरियलध्येच रमली.

‘अभिनय हे माझे उद्दिष्ट नव्हते, तर वेगवेगळे रोल करता करता, त्याचवेळी मी स्वतः कोण आहे, याचे निरीक्षण करत होते. मी म्हणजे या जीवनाच्या रंगभूमीवरची एक व्यक्‍तिरेखाच आहे. हे पात्र भूमिका करताना या जन्मात कुठवर जाणार आहे आणि पुढील जन्मात मी कोण असेन, याचा मी आत्मशोध घेत असते’, असे खोल प्रकट चिंतन सुरेखाने एकदा केले होते. इतकी अस्सल, हाडामासाची म्हातारी अवतीभवती असणे, हा आपल्या द‍ृष्टीने भाग्ययोग होता. त्या म्हातारीने आता ‘एक्झिट’ घेतली आहे.

Back to top button