वैदेही परशुरामी हिचा ‘एक दोन तीन चार’, धमाल उडवणार हे कलाकार

वैदेही परशुरामी
वैदेही परशुरामी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओज "बाईपण भारी देवा" आणि "झिम्मा २" च्या यशानंतर आता १९ जुलैला नवीन 'एक दोन तीन चार चित्रपट घेऊन येत आहेत. वरूण नार्वेकर दिग्दर्शित चित्रपट आहे. बाईपण भारी देवा आणि झिम्मा २ च्या भव्य प्रतिसादानंतर जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवी कोरा, धमाल असलेला आणि तेवढीच हृदयस्पर्शी गोष्ट असलेला 'एक दोन तीन चार' हा नवा चित्रपट येत्या १९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

या कलाकारांची धमाल 

या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो, याची खोचक पेरणी यात केलेली आहे. तसेच दमदार कलाकारांची टीम ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरणार आहे. वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इत्यादी कलाकर यात असणार आहेत. या चित्रपटात निपुण आणि वैदेही ही जोडी पहिल्यादांच एकत्र पाहायला मिळणार आहे. महत्वाचं आकर्षण म्हणजे 'फोकस इंडियन' या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीयावरचा इन्फ्लुन्सर, स्टार 'करण सोनावणे' प्रथमच या चित्रपटाद्वारे मराठी सिनेमात पदार्पण करीत आहे.

या सगळ्यातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 'मुरांबा' या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर हा हरहुन्नरी दिग्दर्शक 'एक दोन तीन चार' हा एक मजेशीर, आगळावेगळा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाबद्दल वरुण नार्वेकर म्हणतात, 'नुकतचं लग्न झालेल्या समीर (निपुण) आणि सायलीला (वैदेही) यांना आयुष्याकडून एक मोठं सरप्राईज मिळतं. यामुळे सुरुवातीला दोघांनाही प्रचंड आनंद होतो. पण नंतर हळूहळू त्याचं टेन्शनही जाणवायला लागतं. आता हे सरप्राईज नेमकं काय आहे ते लवकरच फिल्मच्या प्रमोशनमधून प्रेक्षकांना कळेलच! लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यात येणारा हा अनोखा ट्विस्ट बघायला सर्वांना नक्की आवडेल."

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे. जिओ स्टुडिओजसोबत या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news