Ashok Saraf : मराठी कलाकारांप्रमाणे कॉमेडी इतरांना जमत नाही : अशोक सराफ | पुढारी

Ashok Saraf : मराठी कलाकारांप्रमाणे कॉमेडी इतरांना जमत नाही : अशोक सराफ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मराठी कलाकार हा वाक्य वळवून कॉमेडी करतो. त्यामुळे ती अतिरंजक वाटते. हास्याचे फवारे उडतात, तर इतर कलाकार अंग वळवून कॉमेडी करीत असतात. त्यामुळे त्यात ठसकेबाजपणा नसतो. म्हणूनच मराठी कलाकारांप्रमणे कॉमेडी इतर कोणालाच करता येत नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी व्यक्त केले.

अशोक सराफ यांचा ‘पिफ डिस्टिंग्विश अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरव

पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजित 19 व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल अशोक सराफ (Ashok Saraf) यांना ‘पिफ डिस्टिंग्विश अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

त्या निमित्ताने शुक्रवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले, कोणी गुरू नसला, तरी अनेकांकडून अनेक गोष्टी मी शिकत गेलो. मी मूळचा बेळगावचा. पण वाढलो मुंबईत. मामांची नाटक कंपनी होती. त्यातून ही अभिनयाची कला पुढे आली.

मामा रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. चार्ली चॅप्लिन यांच्याकडून विनोदातील कारुण्य समजले. लॉरेल-हार्डी यांचा स्लॅपस्टीक विनोद भावला. राजा गोसावी यांची शब्दफेक आवडली. त्यातून पुढे गेलो.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर 45 चित्रपटांत काम

आयुष्यात शोधकवृत्ती ठेवली, तर बरेच काही मिळवता येते. मी आजही गोष्टी स्वत: करून बघतो. तेच माझ्या थोड्या-फार यशाचे रहस्य आहे. 1971 साली ‘दोन्ही घरचा पाहुणा’मधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या सराफ (Ashok Saraf) यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर 45 चित्रपटांत काम केले.

त्याबद्दल ते म्हणाले, तो एकाच प्रकारचा विनोद होता. कारण आम्हाला वेगळे लिहिणारे लेखक मिळाले नाहीत; पण आम्ही लोकांना चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघायची सवय लावली. मी माझ्या द़ृष्टीने विनोद करतो, पण तो प्रेक्षकांना कसा वाटतो, हे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा : 

Back to top button