पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरून चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर हिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून चिन्मयला काही नेटकरी सुनावत आहेत की, 'स्क्रिनवर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करता आणि मुलाचे नाव जहांगीर ठेवलंय!' (Chinmay Mandlekar) यावर काही नेटकऱ्यांनी नेहाला ट्रोलदेखील केलं. पण प्रकारानंतर चिन्मयने आता मोठा निर्णय घेतला असून यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असे चिन्मयने म्हटले आहे. आपल्या कुटुंबाला या प्रकारामुळे मानसिक त्रास नको, म्हणून हा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला आहे. (Chinmay Mandlekar)
काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलाचे नाव निघाले होते. त्यावेळी चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव'जहांगीर' असल्याचे समोर आल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होत आहे. त्याच्या मुलाच्या नावावरून त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिने देखील एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करून स्पष्टीकरण दिले होते. ट्रोल झाल्यानंतर नेहाने तीव्र संताप करत जहांगीर नावाचा अर्थ सांगितला होता.
चिन्मय मांडलेकरने म्हटले की, 'तुम्ही मला माझ्या कामावरून वाटेल ते बोला. मी ऐकून घ्यायला तयार आहे. पण, उगाचच चुकीचा विषय घेऊन माझ्या कुटुंबावर आणि त्यांच्या चारित्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.'
चिन्मय म्हणतो की, 'माझा अभिनय तुम्हाला आवडला नाही तर तुम्ही जे म्हणाल, ते मी ऐकून घेईन. पण, माझ्या कुटुंबीयांच्या-मुलाच्या नावावरून त्याच्या चारित्र्यावरून आणि त्याच्या पालकांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातोय, याचे मला खूप वाईट वाटते. आजवर मी अनेक भूमिका केल्या. मात्र माझ्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होणार असेल, तर तो मला कधीच मान्य करणार नाही. म्हणूनच मी यापुढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही.'